मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. अमित शाह महाराष्ट्रात आल्याने महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने महायुतीच्या (Mahayuti) गोटात जागावाटपाची खलबतं सुरु आहेत. या चर्चेदरम्यान अजित पवारांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) ईशान्य मुंबई, दिंडोरी आणि धाराशीव लोकसभेच्या जागेसाठी आग्रह धरल्याचे समजते. 


मविआच्या जागावाटपात ईशान्य मुंबईचा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता असून येथून संजय दिना पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीने हा मतदारसंघ राष्ट्रवादीसाठी सोडल्यास अजित पवार कोणाला रिंगणात उतरवणार, हे पाहावे लागेल. तर कांदा प्रश्नावरुन दिंडोरी मतदारसंघात केंद्र सरकार पर्यायाने भाजपविरोधात नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे हा मतदारसंघ आमच्यासाठी सोडावा, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने धरला आहे. सध्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार या दिंडोरीच्या खासदार आहेत. त्यांच्याविरोधात मतदारसंघात अँटी-इन्कम्बन्सी तयार झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता भाजप ही जागा राष्ट्रवादी काँग्रेससा सोडणार का, हे पाहावे लागणार आहे.


धाराशीवमधून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार कोण?


महायुतीच्या  लोकसभा जागावाटपाच्या चर्चेत अजित पवार गटाने धाराशीव लोकसभेच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास याठिकाणी पक्षाचा उमेदवारही जवळपास निश्चित मानला जात आहे. धाराशीवमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रा. सुरेश (दाजी) बिराजदार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. सुरेश बिराजदार हे गेल्या 5 वर्षांपासून धाराशीव लोकसभा मतदारसंघात तयारी करत आहेत. त्यांनी आजच्या बैठकीत पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. त्यांच्या कार्यकर्त्यांनी 'दाजी फॉर धाराशिव' या नावाने पोस्टर्स झळकावले आहेत. त्यामुळे आता अजित पवार त्यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. 


आणखी वाचा


मोठी बातमी : लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदानाची शक्यता, 14-15 मार्चला तारखा जाहीर होणार?


मविआचं ठरलं! जळगाव, कोल्हापूरचा तिढा सुटला; आता रामटेक, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून चुरस


आनंद अडसुळांना नवनीत राणांचाच प्रचार करावा लागण्याची चिन्हं, महायुती अमरावती लोकसभा युवा स्वाभिमानी पार्टीला सोडणार?