पुणे: केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गट हाच अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटातील संघर्ष आणखीनच तीव्र झाला आहे. त्यामुळे एकेकाळी एकाच पक्षात गुणागोविंदाने नांदणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली आहे. अजित पवार (Ajit Pawar) हे अलीकडच्या काळात शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याविरोधात अधिक तीव्रतेने टीकाही करत आहेत. परंतु, तरीही काका-पुतण्या कधीतरी पुन्हा एकत्र येतील, अशी वेडी आशा राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांना आजही आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या एका सभेत महत्त्वपूर्ण भाष्य केले. आता आमच्या सगळंच फाटलंय, असे सांगत अजित पवार यांनी शरद पवार गटासोबत पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत.


अजित पवार नेमकं काय म्हणाले?


अजित पवार यांनी शरद पवार यांच्यासोबत पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यता संपल्याचे सभेदरम्यान म्हटले. मित्रांना आता तुम्ही मनात वेगळी भावना आणू नका. आता सरळसरळ वेगळी फाटी पडलेली आहेत. आपण इकडच्या फाटीला आहोत, ते तिकडच्या फाटीला. तरीही काहीजण म्हणतात, हे कधीतरी एकत्र येतील का? यामुळेच आमच्यातील निम्मे लोक गार होतात. मध्यंतरी एक कार्यकर्ता मला दबकत म्हणाला की, 'दादा काही होईल का पुढे?'अजूनही लोकांच्या मनात आम्ही एकत्र येऊ ही शंका आहे. पण तसे काहीही घडणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.


सुप्रिया सुळेंचा इन्कार


अजित पवारांच्या वक्तव्यानंतर सुप्रिया सुळे यांच्याकडू भाष्य करण्यात आले. त्यांनी म्हटले की, माझे सगळ्यांशी असलेले वैयक्तिक संबंध मी कधीही लपवलेले नाहीत. माझे सगळ्याच पक्षातील लोकांसोबत संबंध आहेत. कारण मी लोकशाहीवर विश्वास ठेवणारी आहे. माझे विरोधकांशी वैचारिक आणि राजकीय मतभेद असतील पण कोणाशीही मनभेद नाहीत. आमच्या पक्षात फूट पडलेली नाही. पवार कुटुंबात तर अजिबातच फूट नाही, असे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.


आणखी वाचा


राष्ट्रवादीचा मु्ख्यमंत्री म्हणून अजित पवार नाहीतर 'या' नेत्यांना संधी मिळाली असती; प्रफुल पटेलांनी काय म्हटले?


लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर अजित पवार गटातील आमदार शरद पवारांकडे येतील; रोहित पवार