मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणजे राज्यातला एक वजनदार ब्रँड. मात्र आता खुद्द अजितदादाच स्वतःच ब्रँड मेकिंगचे प्रयत्न करत आहेत. यासाठी अजितदादांनी निवडणूक रणनीतीकार नरेश अरोरांची नियुक्तीही केली असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे, विधानसभेची तयारी करणारे एक वेगळेच अजित पवार सध्या दिसत आहेत. अजितदादांना हे सगळं कशासाठी करावं लागतंय, ते जाणून घ्या.


दादांचं ब्रॅण्डिंग, विरोधकांची फिल्डिंग


राज्याच्या राजकारणातला ब्रँड, दादा, 'अजित दादा'.  पवार घराण्याचा वारसा, तरी राजकारणात स्वतःचा ठसा. दादा सांगतात, कार्यकर्ते ऐकतात. दादा आदेश देतात, अधिकारी कामाला लागतात. कधी दादा धक्का देतात, कधी दादा रुसून बसतात, कधी काकांना रामराम ठोकत वेगळी चूल मांडतात आणि आता अजितदादा देव-देव देखील करू लागलेत. स्वतःच्या इमेज बिल्डिंगकसाठी अजित पवारांचा हा खटाटोप सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. 


अजित पवारांच्या ब्रँडिंगसाठी 200 कोटी? 


राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दावा केला आहे की, विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीत अजित दादांना दगाफटका होईल. दादा इमेज बिल्डवर हल्ली जास्त खर्च करत आहेत. यासाठी एका कंपनीला त्यांनी 200 कोटी दिले आहेत. आता रोहित पवारांनी ज्या नरेश अरोरांचा उल्लेख केला ते कोण आहेत, ते वाचा.


कोण आहेत नरेश अरोरा?



  • नरेश अरोरा ब्रँड डिजायनर

  • डिझाईन बॉक्स्ड डॉट कॉम या कंपनीचे संस्थापक

  • राजस्थान, कर्नाटकासह अनेक राज्यांत काँग्रेससाठी प्रचाराचं काम 

  • प्रचार व्यवस्थापनात हातखंडा 


या बैठकीत नेमकं ठरलं काय?



  • 'शब्दाला पक्का, अजितदादा' या कॅम्पेन लाईनवर चर्चा. 

  • 90 दिवसांचा विधानसभा निवडणूक प्लॅन 

  • विरोधकांसाठी नरेटिव्ह सेट करणार

  • अर्थसंकल्पातल्या घोषणा, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणार


अजित पवारांना ब्रँडिंगची गरज का आहे?


राष्ट्रवादीच्या बैठकीला नरेश अरोरा उपस्थित होते आणि पक्षाचं ब्रँडिंग आणि रणनीतीचं प्रेझेन्टेशनही त्यांनी केल्याचं समजतंय. पण अजितदादांना ब्रँडिंगची गरज का आहे, या प्रश्नाचं उत्तर शोधताना राजकीय पंडित खालील गोष्टींची आठवण करून देत आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात ब्रँड अजित पवारला मोठा धक्का पोहोचल्याचं दिसलं. खुद्द बारामतीत अजित पवार पत्नी सुनेत्रा पवारांना निवडून आणू शकले नाहीत. आरएसएसचं मुखपत्र ऑर्गनायझरने थेट अजित पवारांच्या समावेशावरच ताशेरे ओढले. विधानसभेत सत्ता नसली तरी चालेल, पण अजितदादा सोबत नको अशी खदखद पुण्यातले भाजप कार्यकर्ते थेट बोलून दाखवत आहेत.


सर्व प्रश्नांची उत्तर लवकरच मिळतीलच


अजितदादांसारख्या मातब्बर नेत्याला अशा ब्रँडिंगची गरजच काय? ब्रँड मॅनेजरने कितीही प्लॅन तयार केला तरी मुक्त मनाचे दादा किती दिवस ऐकणार? देवाधर्मात फारसे न रमणारे दादा, वारीत, मंदिरात कसे पोहोचले? नरेश अरोरांच्या रूपात दादांना निवडणूक रणनीतीकार लाभला खरा, पण दादांच्या परंपरागत चाहत्यांना, मतदारांना हे रूचणार का? बिनधास्त, बेधडक राजकारण करणारे दादा, अशा ब्रँडच्या कुंपणात किती दिवस बंदीस्त राहणार? विधानसभेसाठी नव्या रोडमॅपसह दादा तयारीला लागले खरे, हा केवळ विरोधकांना इशारा की मित्रपक्षांनाही शह? असे अनेक प्रश्न सध्य उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतीलच, कारण विधानसभेचं घोडामैदान फारसं दूर नाही.