मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीला मोठ्या पराभवाचा फटका बसल्याने विधानपरिषद (Vidhanparishad) निवडणुकीत कुठलाही रिस्क भाजपाकडून घेतली जात नसल्याचेच दिसून येत आहे. सध्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून 12 जुलै रोजी विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात उभे असल्याने निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झालं आहे. आता, कोणत्या पक्षाला दगाफटका बसणार किंवा कोणत्या पक्षाचा उमेदवार पराभव होणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे, कुठलाही पक्षा रिस्क न घेता आमदारांची काळजी घेण्यात मग्न असल्याचे दिसून येत आहे. भाजप (BJP) आणि राष्ट्रवादीने आपल्या आमदारांना मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं आहे. त्यामुळे, भाजप-राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांची पुढील तीन दिवस चांगलीच चंगळ असणार आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार सध्या रिंगणात आहेत त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होण्याची दाट शक्यता आहे. ही फाटाफूट रोखण्यासाठी आता सर्वच पक्षांनी खबरदारी घेतल्याचं पाहिला मिळत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मंगळवारी एक मुंबईत बैठक घेतली आणि त्यात विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होऊ नये, यासाठी सुचना दिल्या. तसेच आगामी निवडणुकीत मतांची गोळाबेरीज देखील केली असल्याची सूत्रांची माहिती आहे. तर, भाजपनेही आता आमदारांची हॉटेलमध्ये सोय केली आहे. तर, एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील आमदारांना मोठ्या हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती आहे.
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जो तो आपली व्यवस्था करत असतो. ही विधानपरिषद निवडणूक आहे. दरम्यान, उद्या संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना एअरपोर्ट जवळच्या ललित हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. विधान परिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खबरदारी घेण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेसाठी दोन उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे, आपल्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी राष्ट्रवादीने ही खबरदारी घेतली आहे.
भाजपचे आमदार ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये
भाजपच्या सगळ्या आमदारांचा मुक्काम ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये असणार आहे. सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. त्यामुळे, सर्वच आमदार मुंबईत आहेत. तरीही विधानपरिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून भाजपचे सगळे आमदार ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये राहणार आहेत. पुढचे तीन दिवस भाजपचेही आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असणार आहेत. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे.
काँग्रेसकडून आमदारांना सूचना
दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसची मते फुटण्याची शक्यता जास्त आहे. पण, अद्याप काँग्रेसकडून कुठलेही हॉटेल बुक करण्यात आलेले नाही. केवळ, सर्व आमदारांना एकत्रित मतदान कसं करावं अशी सूचना करण्यात आली आहे. काँग्रेसकडे एकूण 37 मते असून 23 मतांचा कोटा पूर्ण झाल्यानंतर 14 मते शिल्लक आहेत. ही मते जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकर यांना मिळूं शकतात. मात्र, कमी पडणारी मतं ही प्रत्त्येक पक्षाला गोळा करावी लागणार आहेत.