मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभावचे खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला होता. अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते, असे रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गटात (Ajit Pawar camp) प्रचंड नाराजी पसरली आहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी रामदास कदम यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना त्यांच्यावर जहरी टीका केली.
अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, रामदास कदमजी आपण जोरात बोललात. "मागुन आलेले अजित दादा थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं" माहितीसाठी सांगतो ते वेळेत आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली उशिरा आले असते तर हिमालयात जप करायला जावं लागलं असतं दादांची कृपा म्हणून तुम्ही वाचलात हे विसरू नका, असे मिटकरी यांनी म्हटले आहे. यावर आता रामदास कदम आणि शिंदे गटाचे नेते काय बोलणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीत 100 जागा मागून घ्या; रामदास कदमांची एकनाथ शिंदेंना विनंती
रामदास कदम यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात जोरदार शाब्दिक फटकेबाजी केली होती. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी काही जागांवर महायुतीतील गोंधळामुळे उमेदवार जाहीर होऊ शकला नाही, त्याबाबत नाराजी व्यक्त केली. शिंदे गटाच्या उमेदवारांची घोषणा वेळेत झाली असती तर आज चित्र वेगळं असतं.माझी भावना ताई खासदार म्हणून दिल्लीत गेली असती, माझा हेमंत पाटील दिल्लीत गेला असता, माझा नाशिकचा हेमंत गोडसे दिल्लीत गेला असता, असे कदम यांनी म्हटले.
आता आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेत झालेला गोंधळ थांबवा. नाहीतर मला घेऊन जा. शिंदे साहेब मोदी आणि शाह साहेबांना सांगा, मला 100 उमेदवार द्या, 90 आमदार आपण नाय निवडून आणले तर तुम्ही सांगाल ते आम्ही करु. तुम्ही विधानसभा निवडणुकीला 100 जागा मागून घ्या, असे रामदास कदम यांनी म्हटले.
आणखी वाचा