मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) जागावाटपामध्ये (Seat Sharing In Maharashtra) मिळत असलेल्या दुय्यम दुय्यम भूमिकेमुळे शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी आज (7 मार्च) भाजपवर घणाघाती प्रहार केला होता. केसाने गळा कापून विश्वासघात करू नका, असा इशारा त्यांनी दिला होता. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच रामदास कदम यांचे चिरंजीव सिद्धेश कदम यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी (Maharashtra Pollution Control Board) नियुक्ती करण्यात आली आहे. 


दीर्घ कालावधीसाठी ए. एल. जऱ्हाड  गैरहजर असल्याने त्यांना पदावरून बाजूला करून सिद्धेश कदम यांची त्या पदावरती नियुक्ती करण्यात आली आहे. सिद्धेश कदम गेल्या काही दिवसांपासून मुंबईतून लोकसभेसाठी (Loksabha Election 2024) तयारी करत असल्याची चर्चा होती. ही चर्चा सुरू असताना दुसऱ्या बाजूने शिवसेना शिंदे गटाकडून रामदास कदम यांनी शिवसेना शिंदे गटाला लोकसभा जागावाटपामध्ये मिळत असलेल्या दुय्यम भूमिकेवरती प्रहार केला होता. भाजपला त्यांनी आरोपांच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. त्यामुळे एक प्रकारे रामदास कदम आणि सिद्धेश कदम या दोघांनाही सरकारकडून थंड करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. 


मोदी शहांकडे बघून आम्ही भाजपमध्ये आलो


दरम्यान, रामदास कदम यांनी आज भाजवर कडाडून हल्ला चढवला होता. मोदी शहांकडे बघून आम्ही भाजपमध्ये आलो आहोत. मात्र, पुन्हा विश्वासघात झाल्यास माझे नाव रामदास कदम आहे हे लक्षात ठेवा, असा इशारा त्यांनी भाजप नेतृत्वाला दिला होता. मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरही रामदास कदम यांनी तोफ डागली होती. 


कदम म्हणाले की, ज्या आमच्या जागा आहेत तिथे काही भाजपची मंडळी आम्ही उमेदवार आहोत असं सांगत आहेत. जिथं जातील तिथं हे सुरु आहे. रत्नागिरी, रायगड, मावळ, संभाजीनगर याठिकाणी हा  प्रकार सुरु आहे. जे चाललं आहे ते महाराष्ट्र भाजपच्या माध्यमातून घृणास्पद सुरू आहे. मोदी-शाह यांनी महाराष्ट्रातील काही नेत्यांचे कान पकडले पाहिजेत. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे. परंतु तुमच्यावर विश्वास ठेवून जी लोक आले आहेत, त्यांचा केसाने गळा कापू नका. भविष्यात तुम्ही यातून वेगळा संदेश महाराष्ट्राला देत आहात, याचं भान भाजपच्या लोकांना असणे गरजेचं आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या