कोल्हापूर: समरजीत घाटगे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत तुतारी हाती धरल्यानंतर कोल्हापुरातील राजकारणात खळबळ माजली आहे. समरजीत घाटगे हे आगामी विधानसभा निवडणुकीत कागल मतदारसंघातून अजितदादा गटाचे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात शड्डू ठोकणार आहे. या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात समरजीत घाटगे (Samarjit Ghatge) यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. देवेंद्र फडणवीस यांचा काही लोकांनी विश्वासघात केला. एखादा माणूस किती गैरफायदा घेऊन विश्वासघात करतो. मी विश्वासघात केला नाही, मी शरद पवार साहेबांना सांगून आलो, त्यांनी मला परवानगी दिली, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले. ते सोमवारी बाचणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते.


यावेळी हसन मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांना आव्हानही दिले. कागलच्या जनतेने मला सहावेळा निवडून दिलं म्हणून आता हवा बदलली असेल, असं काहींना वाटते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत अशी हवा बघत राहाल तर, तुमचं वाटोळच होईल, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले.


यावेळी हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर घडलेला एक किस्साही उपस्थितांना सांगितला. शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर आम्ही खासगी विमानाने मुंबईत आलो. मुंबईत खासगी विमानतळ हे वेगळं आहे. तिकडे आम्ही चौघे बसलो होतो. त्यावेळी शरद पवार तिकडे आले. आम्ही सगळ्यांनी त्यांना नमस्कार केला. त्यांनी मला कुठे आलात, असे विचारले. मी उत्तर दिल्यानंतर शरद पवार यांनी म्हटले की, हो तुम्ही तर जनतेची परवानगी घेऊन आलात ना, असे म्हटले, अशी आठवण हसन मुश्रीफ यांनी सांगितली. भावनेच्या भरात जाऊ नका नाहीतर आपलं वाटोळं होईल, असेही यावेळी हसन मुश्रीफ यांनी म्हटले.


“पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी खैर नाही…”


अलीकडेच हसन मुश्रीफ यांनी समरजीत घाटगे यांना इशारा दिला होता. राष्ट्रवादीतून 40 ते 50 आमदार फुटून बाहेर पडले. तरीही शरद पवार माझ्याच मागे का लागले आहेत. हे कळायला मार्ग नाही. पण यानिमित्ताने मी एकच सांगेन की, पवार साहेब तुमच्याशी माझे वैर नाही आणि समरजित तुझी आता खैर नाही. ही निवडणूक नायक विरुद्ध खलनायक अशी आहे, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते. 


आणखी वाचा


बिबट्या, गेंडा, पाटीवरचा देव बाजूला केला ते गांधीनगरातील पाच मीटर कापड! उत्तम जानकरांच्या जहरी टीकेवर हसन मुश्रीफ म्हणाले तरी काय?