कोल्हापूर : कागलमधील झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते उत्तमराव जानकर यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता शेलक्या शब्दांमध्ये जोरदार तोफ डागली होती. हसन मुश्रीफ यांचा गेंडा असा उल्लेख केला होता. तसेच याला काय दिलं नाही? अशी सुद्धा विचारणा केली होती. लोकसभेतील निवडणुकीत माझ्यावर टीका केल्याने मी स्वत: याठिकाणी आलो असल्याचेही जानकर म्हणाले होते. 



मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही


जानकर यांनी केलेल्या टीकेनंतर हसन मुश्रीफ यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार देताना माझी आणि त्यांची ओळख नसल्याचे म्हटले आहे. हसन मुश्रीफ यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. यावेळी त्यांना जानकर यांनी केलेल्या टीकेवरून विचारले असता म्हणाले की, मला त्यांच्यावर काहीच बोलायचं नाही, माझी आणि त्यांची ओळख नाही. मी त्यांचा चेहरा सुद्धा पाहिलेला नाही. जनता किती  चिडली आहे ते तुम्हाला कळेलच, असेही मुश्रीफ म्हणाले. मी त्यांचं भाषण ऐकलेलं नाही आणि मला ऐकण्याची सुद्धा इच्छा नाही.



बिबट्या जंगल सोडून पळाला आणि त्याच्यामागे गेंडासुद्धा पळून गेला


लोकसभेच्या रणधुमाळीत हसन मुश्रीफ यांनी उत्तम जानकर यांच्यावर टीका केला होती, या टीकेचा संदर्भ देत जानकर यांनी हसन मुश्रीफ यांचा गेंडा असा उल्लेख केला. माझ्यावर कागलच्या नेत्यांनी टीका केली, म्हणून स्वत: इथपर्यंत आलो असल्याचे सांगत जानकर त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. 


जानकर म्हणाले की, जंगलाला आग लागली, बिबट्या जंगल सोडून पळाला आणि त्याच्यामागे गेंडासुद्धा पळून गेला. जानकर यांनी नाव न घेता अजित पवार आणि हसन मुश्रीफांवर हल्लाबोल केला. या बहाद्दराला काय दिलं नाही, गोकुळचं दुध प्यायला दिलं, काजू बदाम खायला घातलं. गोरगरीब शेतकऱ्याला कर्ज मिळावं यासाठी याच्याकडे केडीसीसी बँकेच्या चाव्या दिल्या. मात्र, या माणसानं भ्रष्टाचार केला म्हणून याच्याकडे ईडी आली, पण ईडी आल्यावर पोटासहीत पळाला. हा माणूस नतद्दष्ट निघाला, अशा शब्दात उत्तम जानकर यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. साखर कारखान्याला नुसतं संताजी नाव दिलं, याला तर भ्रष्टाचारी साखर कारखाना नाव दिलं पाहिजे, असे म्हणत मुश्रीफ यांनी सुरु केलेल्या साखर कारखान्यावरुनही जानकर यांनी टीका केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या