मुंबई: महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यासमोर एक महत्त्वपूर्ण प्रस्ताव मांडल्याची माहिती समोर आली आहे. अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सोमवारी मुंबई विमानतळावर छोटेखानी बैठक पार पडली होती. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा अमित शाह (Amit Shah) यांच्यासमोर बोलून दाखवल्याचे समजते. अजित पवार यांनी बिहार पॅटर्नचा दाखला देत महायुतीने विधानसभा निवडणूक झाल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करावे, असे अमित शाह यांना सांगितले.  विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या दोन्ही पक्षांनी दावा ठोकलेल्या जागांबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. 


 राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह हे नुकतेच मुंबईत दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी अमित शाह यांनी लालबागचा राजाचे दर्शन घेतले होते. तसेच शाहा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि आशिष शेलार यांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठीही गेले होते. तत्पूर्वी रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर अमित शाह आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. 


याशिवाय, भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी पडद्यामागे जोरदार तयारी सुरु असल्याचेही समोर आले आहे. भाजपचे 50 टक्के उमेदवार निश्चित झाल्याचे समजते.


विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या जागावाटपाबाबत काय ठरलं?


अजितदादा गटातील एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून विधानसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहे. भाजप 288 पैकी जवळपास 150 जागा लढवू शकते. तर अजितदादा गटाला 70 जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा आहे. अमित शाह यांच्यासोबत मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीत विधानसभेच्या 40 जागांबाबत चर्चा झाली. या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्याने आम्ही या जागा सोडणार नाही. याशिवाय, आम्हाला मविआच्या काळातील राजकीय समीकरणानुसार काँग्रेसच्या वाट्याच्या 10 ते 12 जागा हव्या असल्याचेही अजितदादा गटातील नेत्याने सांगितले.


आणखी वाचा


अजितदादा आमचे कॅप्टन, त्यांनी शस्त्र खाली ठेवणं योग्य नाही; अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावर भुजबळांची प्रतिक्रिया