शिर्डी: लोकसभेच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे कसं जायचे, हा प्रश्न होता. मात्र, चार ते पाच महिन्यात आपण मेहनत केली. एका मोठ्या पराभवाला तोंड देऊन मोठा विजय प्राप्त केला, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी केले. ते रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीत आयोजित करण्यात आलेल्या नवसंकल्प शिबिरात बोलत होते. यावेळी प्रफुल पटेल यांनी विविध मुद्द्यांवर सविस्तरपणे भाष्य केले.
देशात मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनले. त्यात महाराष्ट्राचा आणि राष्ट्रवादीचा हिस्सा काय? हा प्रश्न उपस्थित होतो. लोकसभा निवडणुकीच्या निकाला वेळी मी आणि अजित पवार देवगिरीला बसून टीव्ही पाहत होतो. आम्ही एकमेकांचा चेहरा पाहत होतो. आपल्याला खचायचं नाही हे ठरवलं आणि कामाला लागलो. बारामती निकालावरून आपण काही चूक केली आहे का? महाराष्ट्राने आपल्याला नाकारलं आहे का? हा विचार मनात येत होता. कदाचित तोच क्षण एक मोठा विजय खेचून आणण्याचा भाग होता. महायुती म्हणून आपण निवडणुकीला सामोरे गेलो. पाच सहा महिन्यात परिवर्तन होईल, असा निकाल प्राप्त केल्याचे प्रफुल पटेल यांनी म्हटले.
मी आमदारांचे देखील आभार मानतो. कारण त्यावेळी 42 आमदारांनी अजित पवारांना साथ दिली. पक्षाच्या चिन्हावर उभे राहिले आणि निवडून देखील आले. 1991 ला अजित पवार आणि मी पंजावर निवडून गेलो. अजूनही 90 टक्के लोक हे काँग्रेस विचारातून आलेलो आहे. आपली तीच विचारधारा आहे. आपण रातोरात लोकाची विचारधारा बदलू शकत नाही. आम्ही पहिल्यांदा मोदींना भेटलो त्यावेळी आम्ही बोललो की, शिव-शाहू-फुले आंबेडकर हीच आमची विचारधार आहे. त्यांनी देखील तुम्ही यावर ठाम राहा, असे सांगितले.
काँग्रेसची महाराष्ट्रातील ताकद घटलेय: प्रफुल पटेल
काँग्रेस पक्ष आता हळूहळू महाराष्ट्रात कमी होऊ लागला आहे. आपल्याला ती पोकळी भरता येणार आहे. त्यांच्यातील अनेकांची अजित पवारांकडे येण्याची इच्छा आहे. अजित पवार तुम्हाला विनंती आहे पुण्यात एका चौकात बसून कार्यकर्ता नोंदणी करा. आम्हीदेखील ठिकठिकाणी बसतो आणि नोंदणी करून घेतो. 1999 साली माझी वैयक्तिक इच्छा वेगळी होती. त्यावेळी आपल्या सर्वांनी काँग्रेस सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली. आपण सोपा मार्ग निवडला आणि काँग्रेस सोबत सत्तेत सहभागी झालो. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी ऑफर दिली होती की तुम्ही भाजप आणि शिवसेने सोबत आपण सत्तेत सहभागी व्हा आणि केंद्रात देखील एनडीए सोबत सहभागी व्हा. त्यावेळी हा निर्णय घेतला असता तर काँग्रेस कधीच संपून गेलं असती. परंतु मोठ्या वडाच्या झाडाखाली गेलो. त्यामुळे आपण मोठे होऊ शकलो नाही. परंतु आता काही कारणास्तव मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे आपण आपला पक्ष वाढवूयात, असे प्रफुल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
आणखी वाचा
मोठी बातमी! लाडक्या बहिणींचे पैसे कधी जमा होणार? अजित पवारांनी सांगितली तारीख