Ajit Pawar on Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेच्या बाबतीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी मिळणार? याबाबत विविध प्रश्न विचारले जात होते. आज मात्र, अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. 26 तारखेच्या आत लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. उद्यापासून विविध विभागांना भेटून बैठका घेणार असल्याचेही अजित पवार यांनी केलं. यंदाचा अर्थसंकल्प हा आर्थिक शिस्त लावणारा असणार आहे. 


कोणतही यश अपयश कायम नसते


कधी कधी अपयश येते परंतू ते कायमचे नसते. विधानसभा निवडणुकीनंतर आपली जबाबदारी वाढली आहे. महायुतीला लोकसभेला केवळ 17 जागा मिळाल्या होत्या. मात्र, आता वेगळं चित्र आहे. विधानसभेला आपल्याला चांगलं यश मिळाल्याचे अजित पवार म्हणाले. कोणतही यश अपयश कायम नसतं आपल्याला यात सातत्य ठिकवायच आहे असेही ते म्हणाले.  


चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी करणार


सध्या पक्षात अनेकजण येत आहेत. पक्षाची बेरीज झाली पाहिजे. मात्र, पक्षाला कमीपणा यायला नको. जनमानसात प्रतिमा खराब असलेल्या व्यक्तीला पक्षात स्थान नको. गैरवर्तणूक होता कामा नये अशा सूचनाही अजित पवार यांनी केल्या. चुकीचं काम करणाऱ्यांची हकालपट्टी केली जाईल असंही अजित पवार म्हणाले. 


महायुतीनं महिलांना दिलं होतं 2100 रुपये देण्याचं आश्वासनं


लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महिन्याला 1500 रुपये दिले जातात. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीचं सरकार आल्यानंतर महिलांना 2100 रुपये देण्याचे आश्वासनं महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. तसेच त्यांच्या जाहीरनाम्यात देखील त्यांनी हा मुद्दा सामाविष्ठ केला होता. त्यानंतर सरकार स्थापन होऊन डी महिना झाला आहे. त्यामुळं महिलांना 2100 रुपये कधी मिळणार? असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, अखेर महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत. 


राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर तसेच देवेंद्र फडणवीस  यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर लाडकी बहिण योजनेबाबत योग्य भूमिका मांडली होती.  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालूच राहणार आहे. तसेच आम्ही आश्वासन दिल्याप्रमाणे या योजनेच्या लाभार्थी महिलांना महिन्याला 2100 रुपये लवकरच देण्यात येणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. यासह काही महिला निकषात बसत नाहीत, तशा आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे  अर्जांची छाननी केली जाईल, असे संकेत फडणवीस यांनी दिले होते.