Ajit Pawar and Income Tax Department : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवरील टाच आयकर विभागाने सैल केलीये. अजित पवारांची जप्त करण्यात आलेली मालमत्ता आयकर विभागाने परत केली आहे. त्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. दरम्यान, बेनामी संपत्तीचं हे प्रकरण नेमकं आहे तरी काय ? जाणून घेऊयात... 


बेनामी संपत्तीचे प्रकरण नेमकं काय ?


निबोध, प्रतुर्ण, अपरिमेय या तीन कंपन्यांमार्फत नरिमन पॉईंट येथील निर्मल बिल्डिंगमध्ये 13 जून 2014 रोजी जागा विकत घेण्यात आली होती. आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत ही जागा 'बेनामी' संपत्ती असल्याचे निदर्शनास आले. निबोध, प्रतुर्ण, अपरिमेय या कंपन्या प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय करत नव्हत्या. निबोध कंपनीचे पूर्वीचे संचालक मिलिंद करमरकर, अवी गावडे आणि नितीन जोग यांनी त्यांच्या जबाबात ते स्वतः 'डमी' संचालक असल्याचं मान्य केलं. निबोध कंपनीचे विद्यमान संचालक हंसा शहा, कशिश दुडेजा, आरती शहा आणि चांदनी जैन आहेत व ते धीरेंद्र शाह यांचे कर्मचारी असल्याचे समजते. 


धीरेंद्र शाह हे शीतल इंडियाचे पार्टनर आहेत व त्यांनी निबोध कंपनीसाठी स्वतःचे कर्मचारी संचालक म्हणून रिचा रिअलटर्सचे पार्टनर विवेक जाधव आणि सीएच्या सांगण्यावरुन दिले होते. मोहन पाटील आणि नीता पाटील (अजित पवारांचे नातेवाईक) हे निबोध, प्रतुर्ण, अपरिमेय या तिन्ही कंपन्यांचे शेअरहोल्डर असून त्यांच्याच नियंत्रणात कंपन्या असल्याचे आयकर विभागाचे म्हणणे आहे


निबोध, प्रतुर्ण आणि अपरीमेय या कंपन्यांचे शेअर्स जय ऍग्रोटेक (आता स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून ओळखले जाते), कल्पवृक्ष वृक्षारोपण प्रा. लि. या कंपन्यांना ट्रान्सफर करण्यात आले. सगळ्या कंपन्या अजित पवार, पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याच नियंत्रणात होत्या, तर मोहन पाटील व नीता पाटील 'डमी' असल्याचा आयकर विभागाचा निष्कर्ष आहे. 


निबोध, प्रतुर्ण, अपरिमेय या तीन कंपन्यांनी गुंतवणुकीसंदर्भात एक सामंजस्य करार रिचा रिअल्टर्स सोबत केला. रिचा रिअल्टर्सला निबोध, प्रतुर्ण, अपरिमेय या कंपन्यांनी 5 लाख व नंतर 10 लाख रुपये दिले. रिचा रिअल्टर्सकडून निबोध, प्रतुर्ण, अपरिमेय या कंपन्यांना ऑक्टबर 2012 मध्ये 37.6 कोटी देण्यात आले. निबोध, प्रतुर्ण, अपरिमेय या कंपन्या आणि  रिचा रिअल्टर्समध्ये बेनामी देवाणघेवाण झाली व शेवटी ते पैसे स्थावर मालमत्तेत 'पार्क' करण्यात आले. 


पार्थ फौंडेशन बेनामी संपत्तीच्या पत्त्यावरून चालवले जाते, आयकर विभागाचा निष्कर्ष 


अमिकोऍग्री, सु-तारा ऍग्रो, एफपी रिऍलिटी (अजित पवार, पार्थ पवार व साहिल प्रधान संचालक आहेत) या  कंपन्यांचे नोंदणीकृत पत्ते अनंता मर्क्स (पार्थ पवार पार्टनर) कंपनीचे आहेत त्यातून या सर्व कंपन्या अजित पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी चालवल्या जात असल्याचा निष्कर्ष आयकर विभागाने काढला आहे. कशिश दुडेजा या कधीही कंपनीच्या मीटिंगला उपस्थित नव्हत्या त्यांच्या म्हणण्यानुसार बेनामी संपत्तीच्या कागदपत्रावर त्यांनी दौंड साखर कारखान्याचे लेखापाल तुषार दर्जी यांच्या सांगण्यावरून सही केली होती. 


गजानन पाटकर यांनी अप्रत्यक्षपणे या सर्व डमी कंपन्या तयार केल्या व त्या पार्थ पवार यांच्या फायद्यासाठी तयार केल्या होत्या, असं आयकर विभागाचे म्हणणे आहे. प्राधिकरणाने निष्कर्ष काढला आहे कि, या कंपन्या व त्यातील बेनामी आर्थिक व्यवहारांचा कोणताही फायदा थेट अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना झाला हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा आयकर विभागाने सादर केलेला नाही. तसेच बेनामी संपत्तीसाठी पैसेही सुनेत्रा पवार किंवा अजित पवार यांनी दिले आहेत हे आयकर विभागाने सिद्ध केलेले नाही, असं प्राधिकरणाने म्हटलं आहे. त्यामुळे संपत्ती टाच करण्याचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत, असं प्राधिकरणाने म्हटलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Raj Thackeray and Mahayuti : मोठी बातमी: भाजप राज ठाकरेंच्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड करणार, मनसेला विधानपरिषद किंवा महामंडळ मिळणार?