Ahmednagar Politics : कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) आणि भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ असला तरी कर्जत जामखेड मतदारसंघातील (Karjat Jamkhed Assembly Constituency) राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणुकीत आपलाच नेता निवडून येईल यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एक लाख रुपयांची पैज (Bet) लागली आहे.


रोहित पवार आणि राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये एक लाखाची पैज




कर्जत-जामखेड मतदारसंघात सध्या अनेक कामावरुन आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु आहे. दोन्ही आमदारांमध्ये जशी श्रेयवादावरुन लढाई आहे तशीच कार्यकर्त्यांचीही लढाई आहे. आता तर ही लढाई थेट पैज लावण्यावर गेली आहे, तेही एक लाख रुपयांची पैज. आमदार रोहित पवार यांचे अरणगाव इथले समर्थक विशाल डोळे आणि आमदार राम शिंदे यांचे वंजारवाडी इथले समर्थक प्रदीप जायभाय या दोघांमध्ये एक-एक लाख रुपयांची पैज लागली आहे.


रोहितदादा पराभूत होणार आहेत, तू भाजपमध्ये प्रवेश कर असं मला भाजपचे कार्यकर्ते म्हणाले. मी म्हटलं की तुम्हीच प्रवेश करा. रोहितदादा पडणार नाहीत, ते एक लाखांच्या मताने निवडून येणार आहेत. ते म्हणाले पैज लाव. मी म्हटलं एक लाखाची नाही पाच लाखाची लावा. त्यांनी एक लाखाची पैज लावली, अशी रोहित पवार समर्थक विशाल डोळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.


मध्यस्थाकडे एक लाखांचा चेक 


2024 च्या विधानसभा निवडणुकीत कोण विजयी होणार याबाबत विशाल डोळे म्हणतात आमदार रोहित पवार विजयी होणार तर प्रदीप जायभाय म्हणतात आमदार राम शिंदे निवडून येणार. एक लाखांची पैज लागल्याने दोन्ही कार्यकर्त्यांनी एक-एक लाखाचा चेक विष्णू जायभाय या दोघांचाही मित्र असलेल्या मध्यस्थीकडे ठेवला आहे. पैज लागली तेव्हा मी तिथेच होतो. काय होईल काही सांगता येत नाही. शिंदे साहेब कमी नाहीत आणि दादा तर पवार घराण्यातले आहेत. शेवटी कोण येईल, कोण जाईल हे जनता जनार्दन ठरवेल. एक एख लाख रुपयांचे चेक माझ्याकडे आहे. जो कोणी जिंकेल त्याला एक लाख रुपये द्यावेच लागतील, असं विष्णू जायभाय यांनी म्हटलं.


त्यामुळे 2019 मध्ये रोहित पवार यांच्या एन्ट्रीनंतर कर्जत-जामखेडची विधानसभा निवडणूक जशी गाजली होती तशीच येऊ घातलेली विधानसभा निवडणूकही गाजणार आहे यात काही शंका नाही.


भाजपच्या बालेकिल्ल्यात रोहित पवार यांचा विजय


2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री असलेल्या राम शिंदे यांचा पराभव केला होता. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला समजला जात होता. 25 वर्षांपासून या मतदारसंघावर भाजपची सत्ता होती. या मतदारसंघातून सदाशिव लोखंडे हे तीन वेळा तर राम शिंदे हे दोन वेळा भाजपच्या तिकीटावर आमदार झाले होते. राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. अखेर भाजपच्या या बालेकिल्ल्यात रोहित पवार यांचा विजय झाला.


राम शिंदे यांना विधानपरिषदेसाठी संधी


विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपने राम शिंदे यांना विधानपरिषदेसाठी संधी दिली. त्यानंतर 20 जून रोजी झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत राम शिंदे यांचा विजय झाला. राम शिंदे यांच्या रुपाने अहमदनगर जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळाला. राम शिंदे यांची विधानपरिषदेत वर्णी लागल्याने कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला होता.


संबंधित बातमी


दोन आमदारांच्या वादात अधिकाऱ्यांचा बळी, कर्जतचे प्रांतअधिकारी आणि तहसीलदार निलंबीत