Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेतला आणि या नाट्यावर पडदा पडला. शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवृत्तीच्या प्रकरणावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. सवयीप्रमाणे शरद पवार यांनी आपला शब्द फिरवला असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. ते अहमदनगरमध्ये (Ahmednagar) बोलत होते.


शरद पवार यांनी 2 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांसह, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा निर्णय मागे घेण्याची मागणी लावून धरली. अखेर काल (5 मे) शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. यावर प्रतिक्रिया देताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. पवार साहेबांनी म्हटलं होतं की भाकर फिरवली पाहिजे. मात्र त्यांनी आपल्या सवयीप्रमाणे निर्णय फिरवला आहे."


विखे पाटलांच्या हस्ते सरकारी वाळू ठेक्याचे उद्घाटन


सध्या सरकारी ठेक्यामार्फत रास्त भावांमध्ये वाळू धोरण हे शासनाने सुरु केलं आहे. राज्यात प्रथमच अहमदनगरच्या नायगाव इथे या सरकारी ठेक्याचे राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मात्र मागच्या दोन दिवसांमध्ये या ठिकाणाहून वाळू विक्री झालेली नाही. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "ऑनलाईन अॅपची समस्या असल्यामुळे विक्री झाली नव्हती. मात्र ही समस्या लवकरच दूर केली जाणार आहे." त्याचबरोबर ऑनलाईन सोबतच ऑफलाईन वाळू विक्रीबाबत देखील अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं. तर काही ठिकाणी ग्रामपंचायतीकडून अशा सरकारी ठिकाणांना विरोध होत असल्याबाबत विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "संबंधित ग्रामस्थांमध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत आणि ते दूर करण्यासंदर्भामध्ये अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत."


उद्धव ठाकरेंची भूमिका नेहमीच बदलत असते


उद्धव ठाकरे हे बारसू इथल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज दौरा करत आहेत. याबाबत बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, "नाणारच्या वेळी त्यांची वेगळी भूमिका होती, आता वेगळी भूमिका आहे. त्यांची भूमिका नेहमीच बदलत असते. मात्र स्थानिकांच्या काय भावना आहेत याबाबत सरकार त्यांच्याशी चर्चा करत आहे." बारसू प्रकरणाला विनाकारण राजकीय हवा देण्याचा प्रकार होत असल्याचा राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले


औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या शिबिरांसाठी जिल्हा नियोजनमधून निधी देण्याचा विचार


सध्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी शिबिरांचं आयोजन केलं जातं. यासाठी आवश्यकता पडल्यास जिल्हा नियोजनमधून निधी देण्याचा आमचा विचार असल्यास राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. अशा शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि रोजगार निर्मितीसाठी अशा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थी प्रशिक्षित होतील, अशी अपेक्षा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.