Ajit Pawar On Sharad Pawar: शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी (5 मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला. मी तुमच्या भावनांचा अपमान करू शकत नाही, असं आपला निर्णय मागे घेताना ते म्हणाले. तुमच्या प्रेमामुळे मी राजीनामा मागे घेण्याची मागणी मान्य करत आहे, असंही ते म्हणाले. शरद पवारांनी निर्णय मागे घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आपण निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं. पण यावेळी एक वेगळीच चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. ती म्हणजे, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेला अजित पवार (Ajit Pawar) यांची असलेली अनुपस्थिती. माध्यमांमध्ये अजित पवारांबाबत जोरदार चर्चा रंगल्या. मात्र, शरद पवारांनी आपला निर्णय जाहीर करताच अजित पवारांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया जाहीर केली आहे.
अजित पवारांनी केलं ट्वीट...
शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यानंतर अजित पवारांनी ट्वीट केलं. ते म्हणाले की, "राज्यातील,देशातील सर्वपक्षीय नेते,कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करुन आदरणीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याचा घेतलेला निर्णय माझ्यासह पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा उत्साह वाढवणारा,महाविकास आघाडी,देशातील विरोधी पक्षांच्या एकीला बळ देणारा आहे. आदरणीय शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम राहण्याच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यांचं वय आणि प्रकृतीची काळजी घेऊन आपण सर्वांनी येणाऱ्या काळात अधिक जबाबदारी उचलावी." तसेच, "एकजुटीनं आणि अधिक जोमानं काम करावं, साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करावा, असं आवाहन करतो. साहेबांच्या सकारात्मक निर्णयानंतर आम्ही सर्वजण आता पुन्हा नव्या जोमानं पक्षाच्या कामाला लागलो आहोत.", असंही ते म्हणाले.
शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजितदादांची अनुपस्थिती
शरद पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली तेव्हा पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नव्हते. त्याच्या अनुपस्थितीबाबतही अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. पत्रकार परिषदेला अजित पवार उपस्थित नसल्याबाबत खुद्द शरद पवारांनीही स्पष्टीकरण दिलं. शरद पवार म्हणाले की, "प्रत्येकजण पत्रकार परिषदेला उपस्थित राहू शकत नाही. काही लोक इथे आहेत आणि काही नाहीत."
"हा प्रश्न विचारणं योग्य नाही"
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी सर्वानुमते निर्णय घेऊन मला त्याबाबत कळवलं असल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. त्या निर्णयाद्वारे सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणूनच इथे कोण उपस्थित आहे आणि कोण नाही असा प्रश्न उपस्थित करणं किंवा त्याचा अर्थ शोधणं योग्य नाही. समितीत ज्येष्ठ नेते आहेत. सर्वजण एकत्र आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अजित पवार राजीनामा मागे घेण्याचा आग्रह करण्यासाठी आले होते. पक्ष कार्यालयात निर्णय झाल्यानंतर आम्ही पवार यांच्या निवासस्थानी गेलो, तेव्हाही ते तिथेच होते.
राजीनामा मागे घेताना नेमकं काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले की, "2 मे रोजी पुस्तक प्रकाशनात मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील 63 वर्षांच्या सेवेनंतर या जबाबदारीतून मुक्त व्हावं ही माझी इच्छा होती. पण त्यामुळे जनमाणसांत तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी आणि माझे सांगाती असलेली जनता यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली."
"या निर्णयाचा मी फेरविचार करावा याकरता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते, चाहते यांनी मला आवाहन केलं. तसेच देशभरातून विशेषत: महाराष्ट्रातून इतर सहकारी पक्षातील नेते, कार्यकर्ते यांनी मी ही जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी विनंती केली.", असं शरद पवार म्हणाले.
"लोक माझे सांगाती, हे माझ्या प्रदीर्घ आणि समाधानी सार्वजनिक जीवनाचं गमक आहे. माझ्याकडून या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. या लोकांच्या प्रेमानं मी भारवून गेलो. तुमच्या सर्वांकडून आलेलं आवाहन, आणि पक्षातील जेष्ठ नेत्यांकडून घेण्यात आलेला निर्णय यावरून मी सर्वांचा मान राखत मी माझा निर्णय मागे घेत आहे.", असं शरद पवार म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :