NDA Meeting : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सातत्याने घडामोडी घडत आहेत. राजधानी दिल्लीत काल भाजपप्रणित एनडीएची बैठक (NDA Meeting) झाली. या बैठकीनंतर एक वेगळा घटनाक्रम पाहायला मिळाला. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) बैठक घेतल्याची माहिती समोर येत आहे. या नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या भेटीचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. 


भाजप पक्षश्रेष्ठींची मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक


या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे पी नड्डा यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीत बंद दाराआड या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं समजतं. या बैठकीला एकनाथ शिंदे आणि अजित पवार दिल्लीतच होते. त्यांना रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस दिल्लीत पोहोचले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा झाली. या बैठकीत राजकीय घडामोडीनंतर महाराष्ट्रातील राजकीय स्थितीचा आढावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतल्याची माहिती आहे. तसंच तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याचे आदेश देखील दिल्याचं कळतं.


बैठकीत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मानाचं स्थान


दरम्यान राजधानी दिल्लीत काल भाजपकडून एनडीएची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला 38 पक्षांचे नेते उपस्थित होते. एनडीएच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातून शिवसेनेच्या (शिंदे गट) वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (अजित पवार गट) उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले होते.  या बैठकीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं होतं. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी आपल्याच रांगेत बसवलं होतं.  शाह यांनी एकनाथ शिंदेंना एका बाजूला आणि अजित पवार यांना दुसऱ्या बाजूला बसवलं होतं. शिंदेंच्या बाजूला नड्डा आणि त्यांच्या बाजूला मोदी बसलेले होते.


हेही वाचा


NDA Meeting Delhi : दिल्लीमध्ये एनडीएच्या बैठकीचं सत्र, पंतप्रधान मोदी आणि मित्रपक्षातील नेत्यांची भेट