Kirit Somaiya On Sanjay Raut: शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना ईडीने 9 तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अनेक राजकीय पक्षाचे नेते आपली प्रतिक्रिया देत आहे. अशातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले आहेत की, 'संजय पांडे यांच्यानंतर घोटाळेबाज संजय राऊत आता ईडीच्या ताब्यात.' ते ट्वीट करून असं म्हणाले आहेत.
काय म्हणाले किरीट सोमय्या?
किरीट सोमय्या ट्वीट करून म्हणाले आहेत की, ''संजय पांडे यांच्यानंतर घोटाळेबाज संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत हे आता नवाब मलिक यांचे शेजारच्या बनतील. हिशोब तर द्यावा लागेल.''
राऊत यांना ताब्यात घेण्याआधी ईडीचे पथक आज सकाळी 7 वाजताच त्यांच्या घरी दाखल झाले. ईडीने 9 तास खासदार संजय राऊतांच्या दादरमधील फ्लॅटमध्ये त्यांची चौकशी केली. त्यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. ईडीच्या कारवाई दरम्यान दादरमधील गार्डन कोर्ट इमारत परिसरात सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण?
पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते. त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.