Raosaheb Danve On Arjun Khotkar: शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत अखेर शिंदे गटात सामील होण्याची घोषणा केली आहे. दरम्यान भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्यासोबत त्यांची दिलजमाई सुद्धा झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र आता जालना लोकसभेच्या जागेवरून खोतकर यांनी केलेल्या दाव्यानंतर दानवे यांनी खोतकरांवर थेट निशाणा साधला आहे. तर जालना लोकसभा जागेत कुणाला पाय सुद्धा ठेवू देणार नसल्याचं दानवे म्हणाले आहे. 


काय म्हणाले दानवे...


जालना लोकसभा मतदारसंघावर खोतकर यांनी दावा केला असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना दानवे म्हणाले की, जालना लोकसभा हा मतदारसंघ नऊ वेळा भारतीय जनता पार्टीने जिंकलेला आहे. पाच वेळा मी स्वतः या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. दोनदा उत्तमसिंग पवार आणि दोन वेळा पुंडलिकराव दानवे यांनी भाजपच्या वतीने या मतदारसंघात विजय मिळवला आहे. जी जमीन आम्ही 45 वर्षे नागरली, वखरली,पेरली, कंपाऊंड केलं आणि आता तिच्यामध्ये सर्व माल येत आहे. त्यामुळे आज ही जमीन आम्ही कुणाला पाय ठेवला सुद्धा देणार नाही. हा भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे. माझ्या सुद्धा बापाची जहागीर नाही. मी नसेल तर इतर कुणी भाजपचा उमेदवार उभा राहील. पण ही जागा भारतीय जनता पार्टी इतर कुणालाही सोडण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असं दानवे म्हणाले. 


राऊतांवरील कारवाईवर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया 


संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत प्रतिक्रिया देतांना भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले की, अशाप्रकारे आरोप जेव्हा तुमच्यावर होत असेल तर त्या आरोपाचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधला पाहिजे. कोणत्याहीप्रकारे यात राजकारण नाही. त्यांनी केलेलं कृत्यावर पांघरूण घालण्यासाठी भाजपवर आरोप केला जत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. 


लोकसभेवर खोतकरांचाही दावा 


शिवसेना-भाजप युतीत जालना लोकसभा जागेवरून दानवे आणि खोतकर यांच्यातील दावा जुनाच आहे. मात्र खोतकर हे शिंदे गटात सहभागी झाल्यानतर या वादावर पडदा पडेल अशी चर्चा असतानाच, खोतकर यांनी लोकसभेवरील दावा कायम असल्याची घोषणा केली. लोकसभा मतदारसंघ आपल्याला सोडण्याची आपली मागणी कायम असल्याच खोतकर म्हणाले आहे. त्यामुळे आता दानवे-खोतकर वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे.