Bmc Election: पालिका निवडणुकीसंदर्भातील एक महत्वाची बातमी समोर येत आहे. शिंदे सरकार नव्याने प्रभाग रचना तयार करणार आहे. प्रभाग रचना तयार करण्याचे नगर विकास विभागाने आदेशही जारी केले आहेत. त्यामुळेच येणाऱ्या पालिका निवडणूक कशा प्रभाग रचनेनुसार घेतले जाणार आहे, हे पाहणं खूप महत्वाचं होणार आहे. याचा मोठा परिणाम मुंबई महानगरपालिकेसह इतर पालिकांवरही पडू शकतो.      


मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहेत. यातच नवीन मुंबई, औरंगाबादच्या निवडणूक दोन वर्षापेक्षा अधिक काळापासून, तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही फेब्रुवारीपासून प्रलंबित आहे. यातच अनेक ठिकाणी प्रशासक हे पालिकेचे कामकाज सांभाळत आहेत. या सगळ्या संदर्भात सुप्रीम कोर्टातही केस सुरु आहे. त्याचवेळी शिंदे सरकारचा हा आदेश समोर आला आहे.       


यातच एकीकडे असे दिसत आहे की, निवडणुका घेण्यासाठी शिंदे सरकारने तयारी सुरु केली आहे. मात्र इतका सहज याचा अर्थ नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ही केस सुरु आहे. सुप्रीम कोर्टाच्या परवाच्या आदेशात स्थिती जशी आहे, तशी राहूद्या, असं सांगण्यात आलं आहे. याच्या आधी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला खडसावलं होतं की, शक्य असल्यास पावसाळ्यात निवडणूक घ्या. त्यावेळी जी प्रक्रिया होती, ती जवळपास पूर्ण झाली आहे. यातच जर सध्याच्या सरकराने आधीची प्रक्रिया मान्य केली, तर दोन आठवड्यातही निवडणूक होऊ शकते. मात्र शिंदे सरकारला सगळी नव्याने रचना करायची असेल त्यात अधिकचा कालावधी लागाउ शकतो. यामध्ये सगळी प्रक्रिया पार पाडण्यासाठी चार ते पाच महिन्याचा कालावधी लागू शकतो. यामुळे आजच्या आदेशानंतर पालिका निवडणुकीसंदर्भात सरकराचा काय हेतू आहे, हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पुढील आठवड्यात हे प्रकरण पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर मांडण्यात येणार आहे. त्यावेळी यावर पुन्हा युक्तिवाद होऊ शकतो.   


दरम्यान, गेलाय अनेक महिन्यापासून पालिका निवडणूक प्रलंबित असल्याने, या निवडणुका कधी होणार असा प्रश्न आता सामान्य नागरिक ही विचारू लागले आहे. यंदाची मुंबई पालिका निवडणूक ही वेगळी असणार आहे. कारण शिवसेनेत फूट पडून दोन गट झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेत दोन गट पडल्याने मतदार आता कोणत्या गटाला मतदान करतील, शिंदे की ठाकरे? हा पाहावं लागेल.