सोलापूर (पंढरपूर) : आपला पहिल्या टर्मचे आमदार म्हणून अनुभव किती, आपण टीका कोणावर करतो याचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे म्हणत महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना टोला लगावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर रोहित पवार यांनी केलेल्या टिकेला उत्तर देतांना त्यांनी असे म्हटले आहे. दादांनी किती काम केले आहे, हे सगळ्यांनी पाहिले आहे. राजकीय मतभेद असावेत मात्र मनभेद नसावेत असेही तटकरे म्हणाल्या.
भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. यावरून देखील अनेक प्रतिक्रिया येत असतांना अदिती तटकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. "आमची पाच वर्ष तर राजकीय भूकंप पाहण्यातच केली. त्यामुळे आता कोणता राजकीय भूकंप होणार हे सांगू शकत नाही, असे त्या म्हणाल्या.
अंगणवाडी सेविकांनी कामावर हजर व्हावे
राज्यातील 70 लाख बालकांना अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून काळजी घेतली जाते. त्यामुळे त्यांनी कामावर हजर व्हावे. काही प्रश्न राज्य सोबत, काही केंद्र सरकारकडे असतात. त्यासाठी वेळ लागू शकतो. महायूतीचे सरकार आल्यानंतर मार्च 2023 मध्येच राज्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना वाढ केलेली आहे. अंगणवाड्यांचे मूळ अंगणवाडीमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. मदतनिसांची अंगणवाडी सेविकांमध्ये पदोन्नती होणार आहे. नवीन 13000 मदतनीसांच्या जागा तयार झाल्या आहेत. जम्बो भरती केलेली आहे. यांच्या विम्याच्या रक्कम व हप्ता शासन भरत आहे. याबरोबरच पेन्शन योजना ही शासनाकडे प्रस्थापित करत आहोत. पुढच्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये सर्व अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्यात येणार आहेत, असे तटकरे म्हणाल्या.
राजकारणात मनभेद नसावे...
विधानसभेवर निवडून येण्याची माझी पहिलीच वेळ आहे. मात्र, माझ्या विरोधातील पक्षातील नेत्यांबद्दल देखील बोलतांना त्यांचा अनुभव किती, माझा वय किती या सर्व गोष्टी मी लक्षात ठेवत असते. राजकारण आणि समाजकरणात काम करत असतांना या सर्व बाबी लक्षात ठेवून काम केल्यास आपण राज्याला नवी दिशा देऊ शकतो. पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो. आतापर्यंत आपण अनेक असे नेते पहिले आहेत, ज्यांची राजकीय भूमिका वेगळी असते. मात्र, त्यांच्यात कधीही मनभेद किंवा मतभेद नसतात. त्यामुळे टीका करताना भान ठेवले पाहिजे.
इतर महत्वाच्या बातम्या: