पुणे : रोहित पवारच्या (Rohil Pawar) प्रश्नाला उत्तर द्यावं इतका मोठा तो झालेला नाही,तो अजून बच्चा आहे. त्यावर माझे प्रवक्ते बोलतील, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी (Ajit Pawar) रोहित पवारांच्या टीकेवर केली. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो (Baramati Agro) या कंपनीवर ईडीने छापेमारी केली. त्यानंतर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, जर मी काही चुकीचं केलं असतं तर अजित पवारांसोबत भाजपात गेलो असतो. त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देण्यास स्पष्ट नकार दिल्याचं पाहायला मिळालं.
रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कंपनीवर छापेमारी केली. यामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहेत. त्यातच अजित पवारांवर त्यांनी केलेल्या टीकेमुळे अजित पवार गटही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पण यावर अजित पवारांनी कोणतीही ठोस प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी आमदार कांबळे यांच्यावर देखील भाष्य केलं.
तर मी शांत बसलो असतो का?
आमदार कांबळे यांनी माझ्या समोर कोणाला मारलं असतं तर मी शांत बसलो असतो का? मी पुढच्या कार्यक्रमाच्या घाईत होतो. त्यामुळं राष्ट्रगीत होताच बाहेर पडलो, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. पुण्यातीलससून रुग्णालयातील एका कार्यक्रमादरम्यान भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र सातव यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावर आमदार कांबळे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं होतं की, मी फक्त त्यांना ढकलंल मारलं नाही.
शरद पवार तिथे होते म्हणून आलो नाही असं नाही
100 व्या नाट्यसंमेलनामध्ये अनेक नाट्यमयी घडामोडी पाहायला मिळाल्या. या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याला शरद पवार आणि अजित पवार या दोघांनाही आमंत्रण देण्यात आलं होतं. पण या दोघांनीही या सोहळ्याला गैरहजेरी लावली. त्यामुळे चर्चांना उधाण आलं. पण आजच्या नाट्यसंमेलनाच्या दुसऱ्या अंकात शरद पवार यांनी उपस्थिती लावली मात्र अजित पवार उपस्थित नव्हते. यावर अजित पवारांनी म्हटलं की, आजच्या 100व्या नाट्य संमेलनावेळी मी वेगळ्या कार्यक्रमात होतो. शरद पवार साहेब तिथं होतो म्हणून मी आलो नाही, असं काही नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये पवार साहेब असताना मी तिथं जातोच. उगाचंच काहीही गैरसमज पसरवू नका.