Solapur Lok sabha: सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा दोन युवकांमध्ये बिग फाईट होत असून आमदार प्रणिती शिंदेंच्या (Praniti Shinde) प्रचारार्थ सोलापुरात महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा पार पडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच माकपचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम (Narsayya Adam) यांनी आपली भूमिका जाहीर करताना प्रणिती शिंदेंना पाठिंबा जाहीर केला. तसेच, आपण महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) साथ देणार असल्याचंही आडम मास्तरांनी म्हटलं. आडम मास्तरांच्या या भूमिकेकडे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागले होते. कारण, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत सोलापुरातील (Solapur) 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यात आले होते. ज्यासाठी, नरसय्या आडम यांनी मोठे कष्ट घेतले होते. मात्र, मोदींचा पराव करणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचं आडम मास्तर यांनी सोलापुरातील सभेत म्हटलं. 


सोलापुरात आमदार राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी थेट लढत होत आहे. देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय आणि खास माणूस म्हणून आमदार राम सातपुतेंना भाजपाने सोलापूर लोकसभेच्या मैदानात उतरवले आहे. त्यातच, सातपुते यांच्या गळ्यात आमदारकीची माळ पाडण्यासाठी पुढाकार घेतलेल्या अकलूजमधील मोहित पाटील कुटुंबीयांना यंदा प्रणिती शिंदेंच्या बाजुने प्रचार सुरू केला आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या धैर्यशील मोहिते पाटलांनी राम सातपुतेंना इशाराही दिला होता. बीडचं पार्सल यंदा बीडला पाठवणार, असे मोहिते पाटील यांनी म्हटले होते. तर, देवेंद्र फडणवीसांनी सोलापुरातील सभेत सातपुतेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे कामगारांना घरे मिळाल्याचा संदर्भ देत नरसय्या आडम मास्तरांवर टीकाही केली होती. आता, आडम मास्तरांनी या टीकेला हातवारे करुन प्रत्त्युतर दिले. 


मोदींचा पराभव करणे हाच एकमेव उद्देश असल्याचं नरसय्या आडम यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटले. येथील पालकमंत्र्यांनी सांगितलं की, सोलापूरची सीट धोक्यात आहे. आमदार प्रणिती शिंदे 4 तारखेला दिल्लीत जाणार आहेत, असे म्हणत मास्तरांनी प्रणिती शिंदेंच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर, फडणवीसांनी दिलेल्या टीकेला हातवारे करत प्रत्युत्तर दिले. फडणवीस म्हणाले 30 हजार घरे आम्ही दिली, आम्ही काय झक मारली काय मग, असा पलटवार आडम मास्तरांनी केला. यावेळी, सुशील कुमार शिंदेंनाही हसू आवरले नाही. 
गेल्या १४ वर्षांपासून आम्ही वनवास भोगलाय. सोलापूरला, पुण्याला, मुंबईला आणि दिल्लीला हेलपाटे मारले, हजारो लोकांना घेऊन गेलो, तुम्ही तुमच्या घरचे पैसे दिले का?, असा सवालही आडम मास्तरांनी फडणवीसांना विचारला. 


माजी उमेदवार प्रचारात काही नाहीत -प्रणिती शिंदे


ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर आपण जगतो त्यांचं जीव भाजप घेत आहे. सोलापूरच्या जनतेनं दहा वर्षे विश्वासाने तुम्हाला निवडून दिलं. पण तुम्ही विश्वासघात केला. अजूनही भाजपचे उमेदवार मागचे दोन खासदार सोबत घेतं नाहीत. या खासदार राहिलेल्या उमेदवारांना सोबत घेताना तुम्हाला लाज वाटते क?, असा सवाल आमदार प्रणिती शिंदेंनी विचारला. तसेच, माझे वडील आजही माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून फिरतायत, असे म्हणत लेकीसाठी प्रचाराच्या मैदानात फिरणाऱ्या वडिलांची आठवण प्रणिती यांनी सांगितली. आडम मास्तर, माकप, समाजवादी, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट हे सर्वजण आपल्यासोबत आहेत, असेही प्रणिती शिंदेंनी आपल्या भाषणात म्हटले. 


हेही वाचा


ट्रकचालकाने बाईकस्वारास फरफटत नेले, अपघाताचा भीषण व्हिडिओ व्हायरल; नेटीझन्सना गडकरींची आठवण