मुंबई : अखेरच्या टप्प्यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रातील लोकसभेच्या 13 जागांसाठी महायुतीकडून जोरदार ताकद लावली जात आहे. आज पंतप्रधान नरेद्र मोदी यांची दिंडोरीत सभा झाल्यानंतर मुंबईत घाटकोपरमध्ये रोड शो होत आहे. मात्र, या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले नाहीत. प्रकृती अस्वस्थ्यामुळे अजित पवार आज मुंबईत देवगिरी निवासस्थानी आराम करत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी प्रचार रॅली होत आहे. 


दरम्यान, दिंडोरी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. नकली शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार हे निश्चित असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. ही नकली शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन झाल्यावर मला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येईल. हा जो विध्वंस होत आहे तो बाळासाहेबांना सर्वात दु:खी करत असावा. नकली शिवसेनेनं बाळासाहेबांच्या प्रत्येक स्वप्नाचा चुराडा केला आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्याचे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण झाले आहे, मात्र यावरून नकली शिवसेना सर्वाधिक चिडत आहे.


काँग्रेसवर निशाणा साधला


काँग्रेसवर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काँग्रेससाठी अल्पसंख्याक ही एकच गोष्ट आहे, ती त्यांची स्वतःची आवडती व्होट बँक आहे. मला आठवतं, मी त्या वेळी मुख्यमंत्री असताना मी याला कडाडून विरोध केला होता. देशाच्या संपूर्ण अर्थसंकल्पातील 15 टक्के मुस्लिमांवर खर्च व्हावा, अशी काँग्रेसची इच्छा होती, परंतु भाजपच्या तीव्र विरोधानंतर ते यशस्वी होऊ शकले नाहीत. गेल्या 10 वर्षातील माझे काम तुम्ही पाहिले आहे आणि आता मी आज तुमच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, मी तिसऱ्या टर्मसाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, विकसित भारत बनवण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.


इंडिया आघाडीवर टीका


एनडीए आघाडीला किती मोठा विजय मिळणार आहे, हे येथील इंडिया आघाडीच्या एका मोठ्या नेत्याच्या बोलण्यातूनही कळू शकते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांना माहीत आहे की, इंडिया आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसचा इतका पराभव होत आहे की त्याला वैध विरोधी पक्ष बनणेही कठीण आहे. त्यामुळे छोट्या पक्षांचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हावे, असे महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या एका नेत्याचे म्हणणे आहे. ही सर्व दुकाने काँग्रेसमध्ये गेल्यास काँग्रेस वैध विरोधक बनण्याची शक्यता आहे, असे त्यांना वाटते.


इतर महत्वाच्या बातम्या