Eknath Shinde & Prasad Oak Majha Katta : प्रसाद ओक यांना दिघे साहेबांच्या वेशभूषेत पाहून मला पुन्हा दिघे साहेबच माझ्या जवळ असल्याचा अनुभव येत आहे. आनंद दिघे यांनी फक्त ठाण्यासाठीच नाही तर अवघ्या महाराष्ट्रासाठी काम केलं आहे. जिथे कुठे कधी संकट यायची दिघे साहेब आणि त्यांची टीम, आम्ही तिथे पोहोचायचो. त्यामुळे त्यांचं काम इतकं प्रचंड होत की, लोक त्यांना देव मनात होते. ते एक समांतर सरकार चालवत होते. म्हणजेच जिथे कोणाला न्याय मिळत नव्हता. अशाना दिघे साहेबानी न्याय मिळून दिला, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 


एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये एकनाथ शिंदे आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्याशी संवाद साधला. पहिल्यांदाच एक अभिनेता आणि नेता एक चित्रपटानिमित्त एकाच मंचावर दिसले. शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणारे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनप्रवासबद्दल शिंदे आणि प्रसाद ओक याने बऱ्याच आठवणी सांगितल्या आहेत. 


पहिल्यांदा आनंद दिघे कुठे भेटले, शिंदे यांनी सांगितली आठवण


आनंद दिघे हे शिंदे यांच्या आयुष्यात कसे आले याबाबत बोलताना ते म्हणाले आहेत की, मी वयाच्या 19 - 20 वर्षांचा असेल. त्यावेळी मी किसन नगर (ठाण्यात) येथे राहत होतो. त्यावेळी तिथे एक प्रसंग घडला होता. एक सत्य नारायण भगत म्हणून एक व्यक्ती होती. तिथे धर्मांतराच्या संदर्भात एक घटना घडली होती. त्यावेळी आम्हाला कोणीतरी सुचवलं होत की, तुम्हाला एकच व्यक्ती न्याय मिळवून देऊ शकते. तेव्हा आम्ही सर्व तरुण टेंबी नाक्यावर पोहोचलो. तिथे समाधान हॉटेल आहे, तिथेच हॉटेल समोर दिघे साहेब खुर्चीवर बसले होते. त्यांच्याकडे आम्ही गेलो. त्यांना सांगितलं, त्यावेळी तिथे गेल्यानंतर आणि त्याआधी आलेला अनुभव खूप वेगळा होता. 


आनंद दिघे यांच्याबद्दल बोलताना प्रसाद ओक म्हणाला


धर्मवीर या चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक म्हणाला आहे की, दिघे साहेबांमध्ये कोणते कोणते गुण होते, हे दाखवण्यासाठी या चित्रपटाचा हा एक भाग अपुरा आहे. त्यामुळे हा चित्रपट अजून आला पण नाही, मात्र आमच्या मनात याच्या दुसऱ्या भागाची तयारी देखील सुरू झाली आहे. इतकं मोठं त्यांचं कार्य आहे. त्यांची एक स्वतःची कार्यशैली होती. कोणाला किती गरज आहे, त्यानुसार त्या माणसाचे काम तातडीने मार्गी लावले जात होते, असं तो म्हणाला आहे. यावेळी त्याने चित्रपटाचे संवाद देखील बोलून दाखवले आहेत. यातच चित्रपटाची एक संवाद बोलताना तो म्हणाला, ''जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर घ्यायचं नाही.''


या चित्रपटातील एका प्रसंगाबद्दल सांगताना प्रसाद ओक म्हणाला की, या चित्रपटात क्षितिज दाते यांनी शिंदे साहेबांची भूमिका साकारली आहे. दिघे आणि शिंदे साहेबांचा नरिमन पॉईंटला शूट झालेला एक सीन आहे. शिंदे साहेब एका प्रसंगामुळे प्रचंड दुःखात असता. त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी दिघे साहेब त्यांना नरिमन पॉईंटला घेऊन जातात. ज्यामध्ये दिघे साहेब कृष्ण अर्जुनाप्रमाणे बोलताना दिसतात. या चित्रपटात गुरू-शिष्याची परंपरा जपण्यात आली आहे. ज्यात बाळासाहेब आनंद दिघे आणि दिघे साहेब आणि एकनाथ शिंदे असं दाखवण्यात आलं आहे.      


चित्रपटातील याच प्रसंगावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले आहेत की, ती आठवण करतानाही मला अवघड होतंय. त्यावेळी आमच्या दोन मुलांचा अपघात झाला गावी. त्यानंतर माझं संपूर्ण जीवन बदलून गेलं. मुलं बोटिंग करता असताना अपघात झाला. ज्यात दोन्ही मुलं गेली. त्यावेळी श्रीकांत 14 वर्षाचा होता. ही घटना 2 जून 2000 सालातील आहे. त्यावेळी दिघे साहेब हे एक दिवसआड माझ्याकडे यायचे. ते म्हणाले एकदा काय करतोय, तेव्हा मी म्हणालो काही नाही साहेब आता सर्वच संपलं. त्यावेळी साहेब म्हणाले असं करू नको, त्यांनी मला सावरलं. ज्यामुळे आज मी तुमच्यासमोर आहे. त्यावेळी ते मला म्हणाले होते, तुझे कुटूंब लहान नाही तर मोठं आहे. लोकांसाठी काम कर. त्यांनी मला त्यावेळी ठाणे महापालिकेच्या सभागृह नेतेपदाची जबाबदारी दिली. मी व्यस्त राहावं हे त्यामागचं उद्देश होत. त्यावेळी मी ठाणे महापालिकेचा सभागृहाचा नेता होतो, मात्र ते मला कल्याण, अंबरनाथ आणि इतर जिल्ह्यात पाठवायचे. ते कार्यकर्त्यांना सांगायचे मी येत नाही म्हणून एकनाथला पाठवत आहे. कार्यकर्तेही माझं जल्लोषात स्वागत करायचे. साहेब मला अशीच काम द्यायचे जी अवघड असायची, मात्र मी ती काम पूर्ण करायचो.  यावरून प्रवीण तरडे यांची माफी मागत प्रसाद ओक याने चित्रपटातील एक संवाद म्हणाला, ''एकनाथ ही वेळ महत्वाची आहे. तुझे डोळे कोरडे ठेवून लोकांचे ओले डोळे पूस, लोकांचा लोकनाथ हो. अनाथांचा एकनाथ हो.''