Chhagan Bhujbal & Meena Bhujbal Majha Katta : मागील 10 वर्षात माझ्या स्वतःच्या आयुष्यात खूप गोष्टी घडल्या. शिवसेनेच्या पहिल्या सभेपासून मी राजकारणात आहे. व्हीजेटीआय कॉलेजला असताना मी सेक्रेटरी होतो, त्यावेळी मी बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आलो. पूर्वीच राजकारण फार वेगळं होत. मी यशवंतराव चव्हाण यांना लांबून पाहिलं. सुधाकर नाईक यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात होतो. त्यानंतर शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात होतो. मात्र विरोधकांच्या बाबतीत आम्हाला सांगण्यात आलं होत की, त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू जेव्हा सभागृहात यायचे तेव्हा ते नेहमी विरोधकांना आधी नमस्कर करायचे. ही परंपरा इथे ही होती. यामध्ये बरेच राज्यकर्ते आहेत, ज्यात पवार, सुधाकर नाईक असो किंवा शिंदे असतो की विलासराव देशमुख असो. कोणाच्याच मनात द्वेषाची भावना नव्हती. विरोधकांच्या सर्व कार्यक्रमात जाणं, कोण अडचणीत असताना त्यांना मदत करणं. यात आर्थिक मदत ही होती, मग ती स्वतःच्या खिशातून असो की सरकरकडून. पूर्वी विरोधी पक्षाचे नेते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन चहा घेत होते, भेटत होते. पूर्वी राजकीय विरोधक समजायचे. आता विरोधी पक्ष नेते हे राजकीय शत्रू समजायला लागले आहेत. ज्यामध्ये एकमेकांच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये चार ते पाच लोक याच कामासाठी ठेवण्यात आले आहेत, असं राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ म्हणाले आहते. 


एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि त्यांच्या पत्नी मीनाताई भुजबळ याच्याशी संवाद साधला. माझा कट्टा सुरू झाला तेव्हा त्यावेळी या कट्ट्याचे पहिले पाहुणे होते ते म्हणजे छगन भुजबळ. यावेळी बोलताना भुजबळ यांनी आपल्या राजकीय प्रवासासोबतच अनेक आठवणी देखील सांगितल्या आहेत.


बेळगावात जाताना भुजबळांनी मिशी का काढली? 
 
बेळगावाची आठवण सांगताना भुजबळ म्हणाले आहेत की, शिवसेनेत असताना अनेक प्रकरणात नाव आलं होत. त्यामुळे पोलीस माझ्या मार्गावर होते. त्यावेळी घरातून निघताना घराखाली सीआयडी उभे होते. त्यांना चकवा देऊन निघण्यासाठी त्यावेळी मी एक ढगाळ कुर्ता घातला. केसात पचपचीत तेल लावले. तरी वाटलं हे काही बरोबर नाही. म्हणून बाथरूमध्ये गेलो आणि मिशीच काढून टाकली. नंतर खांद्याला शबनम लावून पत्रकार पांडे म्हणून मी तयार झालो. यानंतर घरातून निघताना कुटुंबियांना आणि सीआयडी दोघांना ही कळलं नाही आणि मी तिथून निघालो, असं ते म्हणाले. ते म्हणाले, त्यानंतर मी बाळासाहेबांना भेटायला निघालो. तर मला सोडण्यात आलं नाही. त्यांनी मला विचारलं दुपारची वेळ आहे, असं कसं आला तुम्ही. त्यावेळी मी त्यांना सांगितलं मी भुजबळ आहे. मग त्यांनी मला बाळासाहेबांकडे नेहलं आणि त्यांनी सांगितलं की साहेब तुम्हाला भेटायला हे पांडे पत्रकार आले आहेत. यावर बाळासाहेब म्हणाले खूप वेग घेतला तुम्ही, यावरून नंतर ते पुढे बोलताच राहिले, नंतर त्यांना सांगण्यात आलं हे भुजबळ आहेत. यानंतर त्यांनी मीनाताईंना बोलावलं आणि त्यांना सांगितलं हे पांडे पत्रकार भेटायला आले आहेत. तेव्हा मीनाताईंनी मला नमस्कार केला. यानंतर बाळासाहेबांनी त्यांना सांगितलं हे आपले भुजबळ आहेत.  


भुजबळांनी सांगितला लग्नाचा किस्सा


मीना भुजबळ यांच्यासोबत लग्नाचा किस्सा सांगताना भुजबळ म्हणाले की, ''आमचं लग्न ठरलं तेव्हा मी गेलो बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे. त्यांना मी म्हणालो साहेब लग्नाचं ठरलं आहे, पत्रिका लिहायची आहे. त्यावर बाळासाहेब म्हणाले मजकूर लिहून हवा आहे, जा तिथे दादाकडे. मी त्याच्याकडे गेलो त्यांनी विचारलं काय हवं आहे. तर मी त्यांना सांगितलं पत्रिका लिहायची आहे. त्यावर ते मला म्हणाले बरं, लिही.. मी छगन चंद्रकांत भुजबळ आणि तुझ्या होणाऱ्या पत्नीचे नाव, आम्ही दोघे या दिवशी इतक्या वाजता विवाहबद्ध होणार आहोत. आपण आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहावे. एकीकडे तुझं नाव, दुसरीकडे पत्नीचं नाव लिही, असं ते म्हणाले. यानंतर मी तोच मजकूर ठेवून खाली फक्त माझ्या आजीचं नाव टाकलं.'' भुजबळ तुम्हाला भेटले कुठे, असा प्रश्न मीना भुजबळ यांना विचारण्यात आला असता त्या म्हणल्या, त्यांची मोठी बहीण माझ्या मोठ्या भावाला दिली होती. त्यामुळे आमचं येणंजाणं सुरू होत. यावर भुजबळ म्हणाले, तिथे हिने मला बघितलं आणि माझ्या मागे लागली. असं म्हणतात माझा कट्ट्यावर एकच हशा पिकला. यानंतर भुजबळ म्हणाले सॉरी सॉरी मी हिच्या मागे लागलो. यावेळी भुजबळ यांना मी लहानपणापासून ओळखत होते आणि आम्ही एकत्र खेळायचो, असं मीना भुजबळ म्हणाल्या आहेत.