Brics Summit 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी ब्रिक्सच्या बैठकीत सहभागी झाले होते. चीनने आयोजित केलेली ही बैठक व्हर्चुअल माध्यमात पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा आणि ब्राझीलचे अध्यक्ष बोलसोनारो उपस्थित होते. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे निर्माण झालेल्या भू-राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात म्हटले की, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मी सर्व ब्रिक्स देशांमध्ये आयोजित केलेल्या अद्भूत कार्यक्रमांसाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.
कोविडचा जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज सलग तिसऱ्या वर्षी कोविड महामारीच्या आव्हानांमध्ये आपण व्हर्चुअली भेटत आहोत. जागतिक महामारीचा प्रादुर्भाव पूर्वीपेक्षा कमी झाला असला तरी त्याचे अनेक दुष्परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेत अजूनही दिसून येत आहेत. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेबाबत ब्रिक्स सदस्य देशांचे विचार खूप समान आहेत. त्यामुळे आपले परस्पर सहकार्य जागतिक परिस्थितीच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरले आहे. पंतप्रधान म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांत आम्ही ब्रिक्स देशांच्या राजकारणात अनेक संस्थात्मक सुधारणा केल्या आहेत. ज्यामुळे या संघटनेची परिणामकारकता वाढली आहे. आपल्या न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सदस्यसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही आनंदाची बाब आहे. अशी अनेक क्षेत्रे आहेत जिथे आपल्या परस्पर सहकार्याचा थेट फायदा नागरिकांच्या जीवनात होत आहे.
न्यू इंडियाबद्दल काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
भारताच्या अर्थव्यवस्थेचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, 2025 पर्यंत भारतीय डिजिटल अर्थव्यवस्थेचे मूल्य एक ट्रिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. आपल्या राष्ट्रीय पायाभूत सुविधांनुसार भारतात 1.5 ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची संधी आहे. या वर्षी भारतीय अर्थव्यवस्थेत 7.5 टक्के आर्थिक विकास दर अपेक्षित आहे. न्यू इंडियाचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, 'न्यू इंडिया'मध्ये प्रत्येक क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. आम्ही प्रत्येक क्षेत्रात नवनिर्मितीला पाठिंबा देत आहोत. आमचे परस्पर सहकार्य कोविड-19 नंतरच्या जागतिक व्यवस्थेच्या सुधारणेसाठी उपयुक्त योगदान देऊ शकते. आम्ही गेल्या काही वर्षांत ब्रिक्समध्ये संरचनात्मक बदल केले आहेत. त्यामुळे या संस्थेचा प्रभाव वाढला आहे. ब्रिक्सच्या न्यू डेव्हलपमेंट बँकेची सदस्यसंख्या वाढली ही आनंदाची बाब आहे.