पुणे : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (NCP) फुट पडली असून काका-पुतण्या राजकीय लढाईत आमने-सामने आले आहेत. त्यामुळे, बारामतीमधील पवार कुटुंबीयांतही लोकसभा निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहायला मिळाला. त्यातच, अजित पवारांचे (Ajit pawar) सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांनीही आत्त्यासाठी प्रचार करत अजित काकांच्या विरोधात भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा बारामतीकरांनी शरद पवारांच्यासोबत (Sharad Pawar) असल्याचं दाखवून देत सुप्रिया सुळेंना विजयी केलं. मात्र, नणंद विरुद्ध भावजय हा बारामतीमधील राजकीय सामना देशभर गाजला. त्यामुळेच, आता विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार सामना होतो की काय, अशी चर्चा आहे. त्याच अनुषंगाने शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, शरद पवारांनी थेट उत्तर दिलं नाही.


शरद पवार यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध प्रश्नांना उत्तरे दिली. आता लोकसभेत ज्याप्रमाणे काका-पुतण्याचा संघर्ष सुरू झाला. विधानसभेला नव्या पिढीतील काका-पुतण्याचा संघर्ष दिसणार का, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. तसेच, एकाच घरात 3 संसद सदस्य, 2 विधानसभा सदस्य, त्यात एक उपमुख्यमंत्री आहेत. यावरुन टीका होते, त्याकडे तुम्ही कसं बघता, असाही प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर, मतदारांनी त्याचा विचार करावा, असे उत्तर शरद पवारांनी दिले. त्यानंतर, एकच हशा पिकला. 


बारामती विधानसभा मतदारसंघातून गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार आमदार बनून प्रतिनिधित्व करत आहेत. दर पंचवार्षिक निवडणुकीत शरद पवार यांच्या नेतृत्वातच येथील राष्ट्रवादीची जागा व उमेदवार निश्चित केला जातो. मात्र, यंदा अजित पवार महायुतीसोबत गेल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. तर, महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. त्यातच, अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवल्यास बारामतीत काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष होऊ शकतो. त्याच, अनुषंगाने शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. मात्र, त्यांनी उत्तर देणं टाळलं. 


घरात सगळ्यांना जागा, पण पक्षातील निर्णय एकट्याचा नाही


अजित पवार पुन्हा परत येणार का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणुका येतात आणि जातात. कुटुंब कायम राहतं. ते पुढे म्हणाले की, घरामध्ये सगळ्यांना जागा आहे. मात्र, पक्षांमध्ये जागा आहे की नाही हा व्यक्तिगत निर्णय मी घेणार नाही. माझे सगळे सहकारी संघर्षाच्या काळामध्ये मजबुतीने उभे राहिले त्यांना पहिल्यांदा विचारेन आणि ती तयार झाली तर असे म्हणत त्यांनी हा निर्णय एकट्याचा होणार नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.