नागपूरः शहरात नो पार्किंग मधून गाडी उचलताना एका चालकाला दुचाकीसह क्रेन ने उचलल्याचे प्रकरण ताजे असताना आता गाडी उचलण्यास विरोध करणाऱ्याला वाहतूक पोलिसांनी मारहाण केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नागपूर ट्रॉफिक पोलिसांविरोधात नारिक सोशल मीडियावर रोष व्यक्त करत आहेत. शहरातील सक्करदरा भागातील तिरंगा चौकातील एका हॉटेलसमोर दुचाकी पार्क केलेली होती. वाहतूक पोलिसांनी कंत्राट दिलेल्या टोइंग व्हैन ने दुचाकी उचलत असताना हॉटेलच्या सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला. यावरुन झालेल्या वादानंतर पोलिसाने त्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. तिथे उपस्थित नागरिकांनी त्यास विरोध केला. नागरिकांपैकी काहींनी ही घटना कॅमेऱ्यात चित्रीत केली. ही क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


वाहतूक पोलिस टोइंग व्हैन ने दुचाकी उचलत असताना सुरक्षा रक्षकाने त्याला विरोध केला. तेव्हा पोलिसाने त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तिथे उपस्थित नागरिकांनी त्यास विरोध करत ही कॅमेऱ्यात चित्रीत केली. एकीकडे शहरात अतिक्रमणामुळे फुटपाथ आणि पार्किंगच्या जागा गिळून घेतल्या आहे. मात्र दुसरीकडे जागोजागी खासगी कंत्राटदार नेमून पे अॅन्ड पार्कच्या नावावर नागरिकांकडून पैसे उकळण्यात येत आहे. तर आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी पैसेच मोजत राहावे का असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.


चौकीदाराने लिखित मध्ये माफी मागितलीः पोलिस


यासंदर्भात सक्करदरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयेश भंडारकर यांच्याशी विचारणा केली असता ते म्हणाले, व्हिडीओचा फक्त एक व्हायरल करण्यात आला आहे. पूर्ण व्हिडीओ बघितल्यास त्यात घडलेल्या प्रकरणाची वस्तुस्थिती समोर येईल. पोलिसांच्या कारवाईमध्ये अडथळा आणण्याचा अधिकार कोणालाही नाही. त्या चौकीदाराने पोलिस कारवाईत अडथळा निर्माण केला. नंतर त्याने लिखित स्वरुपात माफीही मागितली.


दुचाकी चालकासह क्रेनवर


काही दिवसांपूर्वी सक्कदरा भागात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनाजवळ थेट वाहन उचलण्याची कारवाई करण्यात येत होती. पोलीस पथक बघून वाहनचालक वाहनावर बसला. तरीही मुजोर कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्याने वाहनासह चालकालाही क्रेनवर उचलले होते. यावर पोलिसांनी कारवाई करत टोईंग वाहनावर तैनात पोलिस कर्मचाऱ्याचा विभाग बदलला आणि कंत्राटदाराच्या त्या कर्मचाऱ्याला काढले असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.