Disha Salian Case: दिशा सॅलियन प्रकरणी नारायण राणे (Narayan Rane)  आणि नितेश राणे (Nitesh Rane)  पितापुत्रांच्या याचिकेवरील आजची सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. मालवणी पोलीस ठाण्यात नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी आज सुनावणी झाली. चार आठवड्यांसाठी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.


सरकारी वकिलांच्या विनंतीवरून हायकोर्टातील सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब करण्यात आली आहे. आता पुढील सुनावणी 29 ऑगस्ट रोजी घेण्याचं निश्चित करण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी राजकीय दबावातून गुन्हा नोंदवल्याचा दावा राणे पितापुत्रांनी केला आहे. राणे पितापुत्रांना याप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे. 


अभिनेता सुशांत सिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सॅलियननं मालवणी येथील आपल्या राहत्या घरी 9 जून 2020 रोजी आत्महत्या केली होती. दिशाच्या मृत्यूप्रकरणी आक्षेपार्ह व बदनामीकारक विधानं केल्याबद्दल मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे आणि नितेश यांच्याविरोधात दिशाच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी राणेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे. 


नेमकं काय आहे प्रकरण? नारायण राणे अडचणीत सापडले? 
अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचं खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. दिशा सालियनची बलात्कार करुन हत्या करण्यात आली असल्याचा आरोप केला होता. पत्रकार परिषदेत घेत नारायण राणेंनी अनेक आरोप केले होते.  दिशा सालियन हिनं आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला होता.  यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.