नागपूरः शहरात 24 बाय 7 पाणी पुरवठा करण्यासाठी 2012मध्ये ऑरेंज सिटी वॉटर (ओसीड्ब्ल्यू)ला पाच वर्षांसाठी कंत्राट देण्यात आले होते. आज दहा वर्षानंतरही शहरातील अनेक भाग टँकरवर अवलंबून आहेत. टँकर माफियांच्या फायद्यासाठी शहरात जाणीवपूर्वक टंचाईचे चित्र निर्माण करण्यात आले आहे. काही नेत्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते यांचा टँकरचा व्यवसाय आहे. त्याच्या फायद्यासाठीच नागपूर महानगरपालिकेच्या तिजोरीतून ओसीडब्ल्यूच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये उकळण्यात येत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य संयोजक रंगा राचुरे यांनी केली. नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर विदर्भ संयोजक देवेंद्र वानखडे, महाराष्ट्र कोषाध्यक्ष जगजित सिंह, महाराष्ट्र आयटी प्रमुख अशोक मिश्रा, उपाध्यक्ष डॉ. जाफरी, उपाध्यक्ष राकेश उराडे, संघटनमंत्री शंकर इंगोले, सुनील मॅथ्यू, अध्यक्ष, ख्रिश्चन अल्पसंख्यांक नागपूर शहर, कोषाध्यक्ष शालिनी अरोरा, युवा राज्य समिती सदस्य कृतल वेलेकर आकरे, उत्तर नागपूर प्रभारी जीतू मुटकुरे, उत्तर नागपूर संयोजक रोशन डोंगरे, मध्य नागपूर संयोजक लक्ष्मीकांत दांडेकर, पूर्व नागपूर संयोजक नामदेव कामडी, दक्षिण पश्चिम संयोजक अजय धर्मे, पश्चिम संयोजक आकाश कावळे, दक्षिण नागपूर संयोजक मनोज डफरे, व्यापारी संघ अध्यक्ष विनोद पेटकर, नागपूर युवा अध्यक्ष श्याम बोकाडे, मध्य संघटन मंत्री प्रभात अग्रवाल उपस्थित होते. यावेळी राचुरे म्हणाले, ओसीडब्ल्यू कंपनी आल्यानंतर परिस्थिती सुधारण्याऐवजी समस्या अधिकच गंभीर बनली. शहराच्या सुमारे निम्म्या लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. ओसीडब्ल्यू कंपनी खोटे दावे करते आणि अधिकारी व नेत्यांच्या संगनमताने मनपाच्या वार्षिक 150-160 कोटी रुपयांच्या तिजोरीची लूट करीत आहे.
नफ्यात असलेला विभाग आज 100 कोटींहून अधिक तोट्यात
2012 मध्ये मनपाचा पाणी विभाग सुमारे 3 कोटी नफ्यात होता, तो आज 100 कोटींहून अधिक तोट्यात आहे. 2020-2021 मध्ये महानगर पालिकेने पाणी विकून 177.61 कोटी रुपये कमावले, तर एकूण 289 कोटी रुपये खर्च केले. म्हणजेच आज 100 कोटींहून अधिकच्या तोट्यात महापालिकेचा जलविभाग आज आहे. जास्त बिले आल्याने जनता त्रस्त असून अधिक बिले पाठवून जनतेला जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. निम्म्या लोकसंख्येला 24 तासही पाणी देणे कंपनीला अद्याप शक्य झालेले नाही. टँकरमाफियांसह कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक पाण्याची टंचाई निर्माण करीत असल्याचा आरोप करण्यात आला. आज ही कंपनी 50-60 कोटींच्या नफ्यात सुरू असून त्याच मनपाचा तोटा वाढत चालला आहे. दुसरीकडे जनता पाण्याच्या पाण्यासाठी आसुसलेली आहे. यावरून या कंपनीला सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही नेत्यांचे संरक्षण असल्याचे स्पष्ट होत आहे.
टँकर माफिया कोण?
बहुतांश नगरसेवकांकडे जवळचे नातेवाईक, मित्र, पक्षाचे कार्यकर्ते यांचे टँकर असून, या टँकरच्या भरवशावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. पाण्याची टंचाई निर्माण झाली नाही, तर या टँकरना कवडीची किंमत राहणार नाही. त्यामुळे नागपुरातील पाणी कृत्रिम असल्याचा आरोप सर्वच नेत्यांनी केला.
भरमसाठ कर भरूनही जनता पाण्यासाठी त्रस्त
उपलब्ध डाटानुसार पाणी स्वच्छ करण्याची क्षमता 975 एमएलडी आहे. त्यातून 80 लाख लोकांना मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. या कंपनीच्या दाव्यानुसार 655 एमएलडी पाणी पुरवठा करून 60 लाख लोकांना मुबलक पाणी मिळायला हवे होते, प्रत्यक्षात जनतेला गरजेपेक्षा कितीतरी कमी पाणी दिले जात आहे. 'ओसीडब्ल्यू'ला काम दिल्यानंतरही गेल्या 10 वर्षांत 171 कोटी रुपये पालिकेने टँकरला दिले आहेत. पाण्याच्या नावाखाली नेते व अधिकाऱ्यांनी पैशांची लूट केली असून, भरमसाठ कर भरूनही जनता पाण्यासाठी आजही त्रस्त आहे, हे यातून स्पष्ट होत असल्याचे 'आप'च्या नेत्यांनी स्पष्ट केले.