Sanjay Raut :  प्रादेशिक पक्षांच्या करंगळीवरच देशाचं राजकारण उभं असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. शिवसेना आज दिल्लीच्या तख्तापर्यंत राजकारण करत आहे. भूमिपुत्रांची भूमिका घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष निर्माण केल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेचा आज 56 वा वर्धापन दिन आहे. अब तक 56 और भी आगे जाएंगे असेही राऊत यावेळी म्हणाले. एक प्रादेशिक पक्ष काय करु शकतो हे शिवसेनेनं दाखवून दिलं आहे. सध्या देशाचं राजकारण हे प्रादेशिक पक्षांच्या जीवावर सुरु आहे, याचं श्रेय बाळासाहेब ठाकरे यांनी द्यायला हवं असे राऊत म्हणाले. दरम्यान, मतांवर दरोडा पडू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्याचं त्यांनी सांगितलं.


खुन करणाऱ्या कैद्यालाही मतदानाचा अधिकार 


खुन करणाऱ्या कैद्याला देखील मतदानाचा अधिकार आहे. मग अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना का मतदानाचा अधिकार नाही? असा सवालही यावेळी संजय राऊत यांनी केला. लोकांनी त्यांना निवडून दिलं आहे. असा आमच्या दोन प्रतिनिधींना मतदानाचा हक्क नाकारला जात आहे. या दोन्ही सदस्यांना कोणत्या न्यायानं मतदानाचा अधिकार नाकारला त्याविषयी संभ्रम आहे. महाविकास आघाडीची दोन मतं कमी करण्यासाठी पडद्यामागून खेळ सुरु आहे. त्यामुळं देशाचं स्वातंत्र्य, न्यायव्यवस्था धोक्यात आली असल्याचं राऊत म्हणाले.


आमदारांना ट्रेनिंगची गरज
 
राज्यसभा असेल विधानपरिषद निवडणूक असेल या निवडणुकीत आमदारांना ट्रेनिंग देण्याची गरज असते. त्यासाठी सगळे सदस्य एकत्र येतात असे राऊत म्हणाले. तसेच मतांवर दरोडा पडू नये म्हणून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवल्याचंही राऊत म्हणाले.  महाविकास आघाडीची दोन मतं कमी करण्यासाठी पडद्यामागून खेळ सुरु असल्याचेही राऊत यावेळी म्हणाले.


हिंदूचे न्याय आणि हक्कांसाठी शिवसेना लढत आहे


शिवसेनेच्या स्थापनेनंतर संपूर्ण देशात प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी जी भुमिपुत्रांची भूमिका मांडली तीच भूमिका घेऊन इतरकही पक्ष स्थापन झाल्याचे राऊत म्हणाले.  महाराष्ट्रात मराठी माणसांचे, देशात हिंदूचे न्याय, हक्क यासाठी शिवसेना लढत आहे. ज्या प्रकारचे वातावरण आज देशात आणि महाराष्ट्रात झालं आहे, त्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भाष्य करणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.