Parbhani Soybean News : सध्या राज्याच्या काही भागात चांगाल पाऊस (Rain) कोसळताना दिसत आहे. मात्र, काही भागात पावसानं दडी मारल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी महिनाभरापासून पाऊस नसल्यानं तेथील शेतकरी चिंतेत असल्याचं चित्र दिसत आहे. परभणी (Parbhani) जिल्ह्यातही गेल्या महिनाभरापासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसाअभावी ऐन शेंगा भरण्याच्या मोसमात सोयाबीन (Soybean) वाळू लागलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी कालव्यांद्वारे प्रकल्पातील पाणी सोडण्याची मागणी केली आहे.
परभणी जिल्ह्यात 3 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड
गेल्या महिनाभरापासून परभणी जिल्ह्यात पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं तेथील शेतकरी चिंतेत आहेत कारण सोयाबीन पिक पाण्याअभावी वाळू लागलं आहे. सध्या सोयाबीन पिकाला पाण्याची गरज आहे. कारण पिक शेंगा भरण्याच्या मोसमात आहे. याकाळात जर सोयाबीनला पामी कमी पडले तर उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यात यंदा जवळपास 3 लाख 75 हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची लागवड करण्यात आली आहे.
सोयाबीनसह इतर पिकही लागली वाळू
सुरुवातीच्या काळात सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळं सोयाबीन पिक पिवळे पडले होतो. मात्र, शेतकऱ्यांनी विविध फवारण्या करुन पिक कसेबसे वाचवले होते. मात्र, मागच्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसानं उघडीप दिल्यानं शेंगा भरण्याच्या मोसमातच सोयाबीन वळून जात आहे. तर इतर पिकंही कोमेजली आहेत. गेल्या महिनाभरापासून पाऊस नाही, सुरुवातीला मोठा पाऊस झाला. त्यामुळ सोयाबीन पिवळं पडलं होते. मात्र अनेक फवारण्या केल्यावर कसेबसे सोयाबीन वाचले होते. मात्र, आता पाण्याची गरज असताना पाऊस पडत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. आम्ही एकरी सोयाबीनला 20 हजार रुपयांचा खर्च केला आहे. शासनानं आम्हाला मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पीक विमा द्यावा. हेक्टरी 50 हजार रुपयांची दत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी
दरम्यान, कालपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. विशेषत: नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात जोराचा पाऊस पडत आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पावसाचे रौद्ररुप पाहायला मिळणार असून, शेवटच्या टप्प्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (109 टक्के) पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यामध्ये काही भागांत मुसळधारांची शक्यता आहे. देशाचा पूर्वोत्तर भाग आणि पश्चिम-उत्तर राज्यांमध्ये मात्र पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या टप्प्यामध्ये देशात बहुतांश भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. प्रशांत महासागरात ‘ला नीना’ स्थिती कायम आहे. अशा वातावरणात सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये देशाच्या बहुतांश भागात दिवसाचे कमाल तापमान सरासरीच्या जवळ किंवा त्यापेक्षाही कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी राहणाऱ्या उत्तर-पश्चिम भागासह दक्षिण-पूर्व राज्यांमध्ये काही भागातच तापमानात वाढ दिसून येईल.