Parbhani news : रासप आमदार रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांनी पोलिसांवर हप्ते खोरीचा आरोप केल्यानंतर आज थेट पोलीस अधीक्षकांवर (Parbhani Police) गंभीर आरोप केले आहेत. जिल्ह्यातील सर्व गोष्टींना पोलीस अधीक्षकांचा पाठींबा आहे, असा आरोप गुट्टे यांनी केला आहे. इतकंच नाही तर पोलीस अधीक्षक, डीवायएसपी यांच्यावर कारवाईची मागणीही गुट्टे यांनी केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अधिक बोलण्यास नकार दिला आहे.
रत्नाकर गुट्टे यांच्यावर गुन्हा
रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी गंगाखेड मधील शांतता समितीच्या बैठकीत थेट पोलिसांवर हप्ते खोरीचा आरोप केला. यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यानंतर रत्नाकर गुट्टे यांनी आज पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पोलीस अधीक्षकांवर गुट्टेंचे आरोप
जयंत मीना हे परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून आल्यानंतर किती खून झाले, किती चोऱ्या झाल्या, याचा हिशेब कोणी देणार आहे का नाही? मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. त्या संदर्भात सल्ला देणंही पोलिसांना जमत नाही. त्यामुळे त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. माझ्या कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल केले आहेत. राजरोसपणे जिल्ह्यात अवैध धंदे सुरू आहेत. याला पाठिंबा पोलीस अधीक्षक यांचा आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक,डीवायएसपी यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी रत्नाकर गुट्टे यांनी केली.
दरम्यान या प्रकरणावर डीवायएसपी श्रेणिक लोढा, गंगाखेड पोलीस ठाण्याचे एपीआय माने यांच्यासह पोलिस अधीक्षक जयंती मीना यांनाही प्रतिक्रियांसाठी विचारले असता, त्यांनी याबाबत आम्ही प्रेस नोट काढलेली आहे, त्यात आमची भूमिका मांडली आहे, असं सांगितलं.
नेमकं प्रकरण काय?
गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिरातील सभागृहात 29 ऑगस्ट रोजी शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा, गंगाखेड महसूलचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्यासह इतर स्थानिक अधिकारी, शांतता समितीचे सदस्य आणि गंगाखेडकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना गंगाखेड विधानसभेचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी थेट गंगाखेड मधील पोलीस अधिकारी हफ्ते घेतात, हे हफ्ते घेणे बंद करा असे म्हणाले होते. या वक्तव्यानंतर त्यांना गंगाखेडचे एपीआय माने यांनी हटकले असता त्यांना ही गुट्टे यांनी ये तू चूप बस मध्ये बोलू नकोस, असे म्हणत दम भरला होता.
यांनतर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रेणिक लोढा यांनी तुम्ही पुरावे द्या आम्ही कारवाई करू, पण अशी जनतेसमोर बदनामी करू नका असे समजावून सांगितले होते. परंतु गुट्टे शांत झाले नाहीत, तेव्हा गुट्टेच्या पदाधिकाऱ्यांनी गुट्टे यांना शांत केले. हा वाद झाल्यानंतर आज पोलिसांनी या प्रकरणात रत्नाकर गुट्टे यांच्यावर पोलीस दलाची बदनामी केल्याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४१२/२०२२ कलम ५०० भा दं वि व कलम ३ पोलीस अधिनियम १९९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गंगाखेड मध्ये गुट्टे आणि पोलिसांत संघर्षाची चिन्हे आहेत.
संबंधित बातम्या
रासप आमदार रत्नाकर गुट्टेंवर गुन्हा दाखल, पोलिसांवर केला होता हफ्तेखोरीचा आरोप