Parbhani News Updates : परभणी जिल्ह्यातील नद्यांमधील वाळू माफियांकडून अक्षरशः बेसुमारपणे उपसा केली जात आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांकडून एका महिन्यात 264 जणांवर गुन्हे दाखल करून तब्बल 33 कोटींचे 121 विविध वाहन आणि वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस एवढी कारवाई करत असताना महसूल विभाग का गप्प आहे, असा प्रश्न उपस्थित होतो. या सर्व प्रकरणानंतर समाज माध्यमांवरही महसूलच्या कारभाराचे धिंडवडे काढले जात आहे. पोलीस कारवाई करू शकतात तर महसूल का नाही? असा थेट सवाल करत परभणीचे अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी नदी बचाव आंदोलनाने केली आहे. 
 
परभणी जिल्ह्यातील गोदावरी, दुधना,पुर्णा या 3 प्रमुख नद्यांमध्ये एकूण 76 वाळूचे घाट आहेत. ज्यातील 56 वाळू घाटांचा लिलाव झालेला आहे. या लिलावात जेसीबीच्या सहायाने वाळू उपसा करण्यास बंदी असताना जेसीबी, बोटी,  पंप आदींच्या माध्यमातून दिवसरात्र घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा किती तरी पट जास्त वाळू उपसा केला जातोय. 


अवैध वाळू उपश्याबाबत जेव्हा तक्रारी सुरु झाल्या तेव्हा महसूल प्रशासनाने एकही कारवाई केली नाही. मात्र पोलीस विभागाकडून मे महिन्यात तब्बल 18 ठिकाणी धाडी टाकत 264 जणांवर गुन्हे दाखल करून तब्बल 33 कोटींची यंत्रसामुग्री आणि वाळू जप्त केलीय. 


पोलीस विभाग एवढ्या कारवाया करत असताना महसूल प्रशासन मात्र कारवाई करत नसल्याने आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी थेट मुख्य सचिवांकडे या अवैध वाळू उपश्याची ईटीएस प्रणालीद्वारे मोजणी करून चोकशी करण्याची मागणी केलीय. तर या अवैध वाळू उपश्याला अप्पर जिल्हाधिकारी हेच जवाबदार असून त्यांच्या मालमत्तेसह त्यांचे सीडीआर तपासणी करत चोकशी करण्याची मागणी नदी बचाव आंदोलनाने जिल्हाधिकारी, मुख्य सचिवांकडे केलीय.


याबाबत अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिलाय. तसेच जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनाही आम्ही याबाबत विचारले असता त्यांची याबाबत प्रतिक्रिया दिली नाही. 


परभणीत केवळ मे महिन्यात पोलिसांनी केलेली कारवाई 


एकुण दाखल गुन्हे- 18 
गुन्ह्यातील आरोपींची संख्या- 264
यातील अटक असलेले आरोपी- 102
रेतीसह जप्त केलेल्या यंत्रसामुग्रीची किंमत- 32 कोटी 50 लाख 33 हजार 300 रुपये


पकडलेली वाहन
हायवा- 53
पोकलँड- 31
जेसीबी-9
वाळू ब्रासमध्ये- 5015 ब्रास वाळू
टिप्पर-9
बोटी-3
पंप 3
ट्रक- 5 
ट्रॅक्टर- 1
मोटारसायकल-8