परभणी : माणसावर कधी कोणती वेळ येईल हे सांगता येत नाही. परभणीत लग्नाच्या वरातीत गाणं गात असताना महिलेला हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आणि हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आनंदाच्या क्षणी घडलेल्या या दुर्दैवी घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. संगीता गव्हाणे असं या महिलेचं नाव आहे.


परभणी शहरातील पाथरी रस्त्यावर 22 मे रोजी एक लग्न होतं. मोठ्या थाटामाटात या लग्नातील नवरदेवाची वरात निघाली होती, ज्यात एकीकडे बँड वाजत होता. वराती नाचत होते आणि याच वरातीत गाणे गात होत्या त्या संगीता गव्हाणे. गव्हाणे गाण गात असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि खाली कोसळल्या. सगळे आनंदात असताना अचानक हा प्रसंग घडला यावेळी त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला होता. 


संगीता गव्हाणे गाणं म्हणत असतानाच एक जण व्हिडीओ रेकॉर्ड करत होता. त्याच व्हिडीओमध्ये त्या कोसळताना दिसल्या आणि हा व्हिडीओ बघता बघता सर्वत्र व्हायरल झाला. या घटनेने परभणीसह जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.


लग्नच्या वरातीत भर उन्हात नाचल्याने तरुणाचा मृत्यू
दरम्यान महिनाभरापूर्वी भर उन्हात लग्नाच्या वरातीत नाचल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सोहम शहाणे असं या तरुणाचं नावं होतं. तो जिंतूरमधील सराफा व्यापाऱ्याचा मुलगा होता. मित्राच्या लग्नासाठी भर उन्हात दुचाकीवरुन तो परभणीला आला होता. वरातीत नाचल्यानंतर तो थकला. तहान लागल्याने तो थंड पाणी प्यायला. मात्र त्याला अचानक उलटी झाली. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्याचा मृत्यू झाला. भर उन्हात नाचल्याने उष्माघातामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा म्हटलं जात होतं.


मित्रांसोबत डान्स करताना नवरदेवला हार्ट अटॅक
तर गुजरातमध्येही याच महिन्यात लग्नसमारंभादरम्यान दुर्दैवी घटना घडली होती. वरात निघण्यापूर्वी मित्रांसोबत डीजेवर नाचत असताना नवरदेवाला हृदयविकाराचा झटका आला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील मांडवी तहसील अंतर्गत असलेल्या अरेथ गावात ही घटना घडली. मितेश भाई चौधरी (वय 33 वर्ष) असं या नवरदेवाचं नाव होतं