Parbhani Rain Update : मराठवाड्यातील अनेक भागात गेल्या तीन-चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. दरम्यान परभणी (Parbhani) जिल्ह्यात देखील मागील तीन दिवसांपासून सतत कमी-अधिक प्रमाणात पाऊस (Rain) पडतोय. पावसाची संततधार सुरुच असल्याने नदी नाल्यांसह धरण क्षेत्रातही पाण्याची आवक सुरु आहे. तसेच येलदरी धरण तसेच पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण बंधाऱ्यातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. तर काही ठिकाणी शेतात पाणी तुंबल्याने पिकांचे देखील नुकसान झाले आहे. 


परभणी शहर परिसरात शुक्रवारी तसेच शनिवारी दुपारपर्यंत रिमझिम पाऊस सुरु होता. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये रस्ते जलमय झाल्याचे चित्र होते. दरम्यान याचवेळी ग्रामीण भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील येलदरी धरणामध्ये सुमारे 58 टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेष म्हणजे मागील आठ दिवसांमध्ये या पाणी साठ्यात तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय लोअर दुधना, पाथरी तालुक्यातील तारुगव्हाण बंधारा आणि पूर्णा, गोदावरी, दुधना यासारख्या नद्यांच्या पाणी पातळीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. 


जोरदार पावसाची हजेरी...


परभणी जिल्ह्यात शनिवारी (22 जुलै) सकाळी 8 वाजेपर्यंत 10.8  मिमी पावसाची नोंद झाली आहे. ज्यात परभणी तालुक्यात 12.7 मिमी, गंगाखेड 8.5 मिमी, पाथरी 4.9 मिमी, जिंतूर 11.0 मिमी, पूर्णा 16.0 मिमी, पालम 11.3 मिमी, सेलू 14.0 मिमी, सोनपेठ 4.6 मिमी, तर मानवत तालुक्यात 8.6 मिमी असे एकूण 10.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच शनिवारी सकाळपासून परभणी शहरासह जिल्ह्यात रिपरिप पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले. 


येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ 


दरम्यान जिंतूर तालुक्यातील येलदरी परिसरास आठ दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून या पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून वाहत आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्वांत मोठा प्रकल्प असलेल्या पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ सुरु झाली. आतापर्यंत तीन टक्के पाणीसाठा वाढला आहे. सध्या धरणात 58 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.


पावसाळ्यात अशी काळजी घ्या...


परभणी जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस होत असल्याने प्रशासनाकडून काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीसंदर्भात खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरात असल्यास आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर ती त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तसेच नागरिकांनी आपले शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षित स्थळी आणून ठेवण्याच्या सूचनाही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत.  


इतर महत्वाच्या बातम्या: 


Nanded Rain Update : नांदेड जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही धो धो पाऊस बरसला; 13 मंडळात अतिवृष्टीची नोंद