Nanded Rain Update : गेल्या तीन-चार दिवसांपासून नांदेड (Nanded) जिल्ह्यात दमदार पाऊस (Rain) कोसळत असल्याने हाहाकार पाहायला मिळत आहे. दरम्यान किनवट आणि माहूर या दोन तालुक्यात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले. तर पैनगंगा नदीला पूर आल्याने ती पात्र सोडून वाहत असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेष आणखी चार दिवस नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे या सर्व परिस्थितीवर प्रशासन लक्ष ठेवून आहे.
तिघांची सुटका करण्यात आली...
शुक्रवारी रात्री जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्याने माहूर आणि किनवट तालुक्यातील सगळ्याच मंडळात धुंवाधार पाऊस झाल्याने पैनगंगा नदीला पूर आला आहे. दरम्यान माहूर तालुक्यातील टाकळी येथील रामचंद्र भागवत भंडारे (वय 29 वर्षे), भागवत रामचंद्र भंडारे (वय 75 वर्षे) आणि भाग्यश्री रामचंद्र भंडारे (वय 25 वर्षे) हे तिघेही शेतात कामासाठी गेले असताना पुराच्या पाण्यात अडकले होते. दरम्यान बचावकार्य करुन त्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. तर याच भागातील मोमीनपुरा भागात पुराचे पाणी शिरल्याने, या परिसरातील 80 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.
13 मंडळात अतिवृष्टी
तर नांदेड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत किनवट व माहूर तालुक्यातील 13 मंडळात अतिवृष्टी झाली असून, जिल्ह्यात 49.50 मिमी पाऊस झाला आहे. ज्यात नांदेड तालुक्यात 38.20 मिमी, बिलोली- 41.90 मिमी, मुखेड – 12.60 मिमी, कंधार- 13.30 मिमी, लोहा - 18.50 मिमी, हदगाव – 41.50 मिमी, भोकर - 39 मिमी, देगलूर - 33.40 मिमी, किनवट – 150.20 मिमी, मुदखेड - 34.40 मिमी, हिमायतनगर – 30.50 मिमी, माहूर- 185.90 मिमी, धर्माबाद – 26.50 मिमी, उमरी - 37 मिमी, अर्धापूर – 41.20 मिमी, नायगाव – 30.20 मिमी पावसाची नोदन झाली आहे.
आज पुन्हा यलो अलर्ट...
दरम्यान मुंबईच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने 23 जुलै ते 26 जुलै चार दिवसासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे 23 ते 26 जुलै ह्या चार दिवसात जिल्ह्यात एक किंवा दोन ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तर अशा परिस्थितीत नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अतिवृष्टीमुळे पैनगंगा आणि पूस नदीला पूर
यवतमाळ जिल्ह्यात सलग दोन दिवसापासून अतिवृष्टीमुळे पैनगंगा आणि पूस नदीला पूर आला आहे. तर या पुराचा फटका अनंतवाडीसह लेवा बारभाई तांडा आणि परिसरातील गावांना बसत आहे. जवळपास यवतमाळला 216 मिलिमीटर पाऊस झाला आहे. लेवा ते बारभाई तांड्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलाला पुराचा फटका बसला आहे. तर हा रस्ता बंद झाल्याने नागरिकान त्रास सहन करावा लागत आहे. तसेच पुरामुळे शेतीचे देखील मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच दोन दिवसांपासून मोबाईलला नेटवर्क देखील नसल्याने संपर्क तुटला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
Rain News : पैनगंगा नदीला पूर, महाराष्ट्र-तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला; प्रशासन सतर्क