परभणी: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात परभणीकरांसाठी (Parbhani News) आनंदाची बातमी आहे. परभणीच्या पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर येथे होत असलेल्या जय भवानी महिला सहकारी सुतगिरणीच्या (Textile) 80 कोटींच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. 4 जानेवारी रोजी राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडून मान्यतेचे आदेश काढण्यात आले आहेत.
परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पुर्णा तालुक्यातील एरंडेश्वर शिवारात तब्बल 30 एकर जमीन घेऊन जयभवानी महिला सहकारी सूतगिरणीची स्थापना केली होती. ज्या सूतगिरणीची स्थापना 9 ऑगस्ट 2017 रोजी करण्यात आली होती. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सूतगिरणीचे भूमीपूजन देखील करण्यात आले होते. या सूतगिरणीची शासकीय अर्थसहाय्यासाठी 2018 मध्ये निवड करण्यात आली. त्यावेळी एकूण प्रकल्प अहवाल 61 कोटी 74 लाख एवढा होता. परंतु 17 जून 2021 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्यातील सहकारी सूतगिरण्यांची प्रकल्प किंमत 80 कोटी 90 लाख इतकी निश्चित करण्यात आली. सुतगिरणीने महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई यांच्याकडून सुधारीत प्रकल्प अहवाल तयार करुन घेतला आहे. विविध अटींच्या अधीन राहून सदर सूतगिरणीच्या 80 कोटी 7 लाख 24 हजार या सुधारित प्रकल्प किंमतीस मान्यता देण्यात आली आहे..
जयभवानी महिला सहकारी सूतगिरणीने मंजूर 80 कोटी 7 लाख 24 हजार किंमतीमध्ये प्रकल्पाची उभारणी पूर्ण करायची आहे. ज्यात जमीन व सुधारणा करण्यासाठी 89 लाख 45 हजार,फॅक्ट्री इमारत आणि इतर बांधकामासाठी 19 कोटी, प्लांट आणि मशिनरी 40 कोटी, इतर कायम मालमत्तेसाठी 9 कोटी,स्टोअर आणि स्पेअरसाठी 88 लाख, मार्जिन मणी 4 कोटी 11 लाख प्रिऑप्रेटिंव्ह खर्च 1 कोटी 87 लाख, कॉन्टीजन्सी 3 कोटी 44 लाख असा खर्च करायचा आहे. ज्याला शासनाने मान्यता दिली असुन राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे कक्ष अधिकारी प्रसेनजीत कारलेकर यांनी याबाबत शासन आदेश काढले आहेत.
वर्षभरात सुतगिरणी उभी करू: आमदार डॉ. राहुल पाटील
सहा वर्ष या सूतगिरणीसाठी आम्ही लढलो आहेत त्याचे आता फलित झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहेत. पुढच्या वर्षभरात या सुतगिरणीचे बांधकाम पूर्ण करण्याचा आमचा मानस असुन परभणीकरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे या सुतगिरणीचे संस्थापक आमदार डॉ राहुल पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले आहेत.
महिला रोजगाराबरोबरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही फायदा होणार: डॉ. संप्रिया राहुल पाटील
सरकारने नवीन सुधारित प्रकल्पास मान्यता दिली हा निर्णय अतिशय आनंद देणारा असुन या 25200 चात्यांची ही सूतगिरणी तब्बल 30 एकरमध्ये उभारली जाणार आहे. सुतगिरणीच्या माध्यमातून जवळपास दोन ते अडीच हजार महिलांना रोजगार मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रात कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया जयभवानी महिला सहकारी सूतगिरणीच्या अध्यक्षा डॉ. संप्रिया राहुल पाटील यांनी दिली आहे..