Parbhani News : आधीच इंधन दरवाढीने होरपळलेल्या परभणीकरांना आणखी एक झटका बसला आहे. परभणी (Parbhani) शहरातील रिक्षाचालकांनी भाडेवाढ (Fare Hike) केली आहे. तब्बल पाच रुपये प्रति सीट अशी भाडेवाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे परभणीकरांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. इंधन दरवाढ (Fuel Rate Hike) आणि शहरातील रस्त्यांची झालेली दूरवस्था (Bad Road Condition) यामुळे रिक्षा चालवणं परवडत नसल्याने भाडेवाढ करण्याचा निर्णय रिक्षाचालकांनी घेतला आहे.


परभणीकरांना आता 15 रुपयांऐवजी 20 रुपये मोजावे लागणार


नवीन वर्षात परभणी शहरातील रिक्षा संघटनांनी बैठक घेऊन भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला, ज्यात 15 रुपये प्रति सीटऐवजी 5 रुपये वाढवून 20 रुपये प्रति सीट हा नवा दर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात कुठेही जायचे असेल तर 20 रुपये प्रति सीटप्रमाणे आता रिक्षाचालकांना पैसे द्यावे लागणार आहेत. 


इंधन दरवाढ आणि रस्त्याच्या दूरवस्थेमुळे रिक्षाची भाडेवाढ


परभणीत आधीच इंधन सर्वात महाग आहे. तसंच शहरातील रस्त्यांची चाळण झाल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत. त्यातच आता रिक्षाचालकांनी केलेली ही भाडेवाढ ही सामान्य परभणीकरांच्या आर्थिक बजेटवर घाला घालणारी आहे. मात्र आम्हाला ही भाडेवाढ करण्या शिवाय पर्याय नसल्याचे रिक्षाचालकांचं म्हणणं आहे.


इंधन दरातही परभणीत नंबर 1 


राज्यातील इतर शहरांच्या मानाने परभणी जिल्ह्यामध्ये इंधनाचे दरही सर्वात जास्त आहेत. परभणी शहर आणि जिल्ह्यामध्ये पेट्रोल 108.96 रुपये आणि डिझेल 95.37 रुपये या दराने विक्री केले जात आहे. ज्यामुळे अगोदरच परभणीकरांचे कंबरड मोडलेल असताना आता ऑटो चालकांनीही या इंधन दरवाढ आणि शहरातील असुविधांमुळे चक्क पाच रुपयांची भाडे वाढ केली आहे त्यामुळे हा वेगळा आर्थिक भुर्दंड परभणीकरांना सोसावा लागत आहे.


सात महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर


क्रूड ऑईलच्या दरामधील घसरणीमुळे देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला आहे. तब्बल सात महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणतीही वाढ केलेली नाही. 22 मे 2022 नंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. मे महिन्यापासून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत विक्रमी घसरण होत असताना सर्वांच्या नजरा देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीकडे लागल्या होत्या. पण आजही भारतील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.