परभणी : राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीची (Election) आरक्षण सोडत आज जाहीर होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असल्याने निम्म्या जागांवर महिलाच उमेदवार असतील. त्यातच, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाल्याने त्यांनाही ओबीसी आरक्षणातून निवडणूक लढवता येत आहे. परभणी शहर महानगरपालिकेच्या (Mahapalika) एकूण 65 जागांसाठी आज आरक्षण निश्चिती करण्यात आली आहे. शहरातील बी रघुनाथ सभागृहात आयुक्त नितीन नार्वेकर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. ज्यात 2017 च्या तुलनेत ओबीसी प्रवर्गाची एक जागा घटली असून खुल्या प्रवर्गाची एक जागा वाढली आहे.
परभणी महापालिकेसाठी जाहीर केलेल्या आरक्षणामुळे काही दिग्गजांना आपला प्रभाग बदलावा लागणार आहे तर अनेकांचे प्रभाग हे कायम राहिल्याने काही जणांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. तर काही जणांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. परभणी महानगर पालिकेत एकूण 65 जागा महापालिका सदस्यांसाठी असून या जागांमध्ये खुला प्रवर्ग, खुला प्रवर्ग महिला, अनुसुचित जाती, अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला अशा प्रवर्गांचे आरक्षण निश्चित झाले. या आरक्षण सोडती ऐकण्यासाठी व आरक्षण निश्चित प्रक्रियेसाठी शहरातील इच्छुक उमेदवारांनी बी रघुनाथ सभागृह येथे गर्दी केली होती. शहरातील एक-एक प्रभागाचे आरक्षण निश्चित होताच इच्छुकांनी आपल्या मनाप्रमाणे आरक्षण निघाल्यास जल्लोष केला तर काहींनी हिरमोड झाल्याने सभागृहातून काढता पाय घेतला. विशेष करून युवकांचा जल्लोष अधिक प्रमाणात होता.
परभणी मनपा संभाव्य सदस्यांसाठी जागांचे आरक्षण
सन २०२५ ची सध्याची स्थिती
एकूण ६५
खूला २०
खूला महिला - १९
एससी ८ (४ महिला)
एसटी १ (महिला)
ओबीसी १७ (९ महिला)
सन २०१७ ची स्थिती
एकूण ६५
खूला १९
खूला महिला - १९
एससी ८ (४ महिला)
एसटी - १
ओबीसी - १८