परभणी: विद्यार्थ्यांच्या काही कृत्यामुळे शाळा-महाविद्यालयाची अब्रू वेशीवर अनेकदा टांगल्याचं पाहायला मिळतंय. पण आता त्यात शिक्षकही मागे राहिले नाहीत. राज्यात रोज कुठे ना कुठे काही शिक्षकांकडून करामती केल्या जातात आणि त्यामुळे पाहणाऱ्यांचे मात्र मनोरंजन होतंय. गंगाखेडच्या महाविद्यालयात एक उपप्राचार्य आणि प्राध्यापकामध्ये बोलता बोलता वाद झाला आणि नंतर त्यांच्यात हाणामारी सुरू झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी मात्र या सिनेस्टाईल हाणामारीचे व्हिडीओ व्हायरल केले.
परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील संत जनाबाई महाविद्यालयातील उपप्राचार्य डॉ. दयानंद उजळंबे आणि प्रा. लड्डा यांच्यात कॅन्टिनमध्ये सिनेस्टाईल हाणामारी झाली. यावेळी त्या ठिकाणी असलेल्या इतर प्राध्यापकांनी दोघांनाही आवरण्याचा प्रयत्न केला पण दोघेही थांबले नाहीत. 5 मार्च रोजी हा प्रकार घडला असून विद्यार्थ्यांनी याचे व्हिडीओ काढले आहेत आणि ते आता व्हायरल झाले आहेत. त्यामुळे गंगाखेड महाविद्यालयाची लक्तरे मात्र वेशीवर टांगली गेली.
चर्चेदरम्यान वाद अन् हाणामारी
संत जनाबाई शिक्षण संस्थेतील महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. दयानंद उजळंबे गुरुवार, 5 मार्च रोजी त्यांच्या काही सहकारी प्राध्यापकांसह चहापान करत बसलेले होते. यावेळच्या चर्चेदरम्यान त्यांचा वनस्पती शास्त्र विषयाचे प्रा. डॉ. आर जी लड्डा यांच्याशी एका विषयावरून शाब्दिक वाद झाला. बोलता बोलता हा वाद इतका विकोपाला गेला की डॉ. लड्डा यांनी डॉ. उजळंबे यांच्यावर हल्ला चढवत मारहाण करायला सुरुवात केली.
डॉ. उजळंबे यांनीही त्याला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. सोबत असलेल्या इतर प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. पण तरीही हे दोघे ऐकत नव्हते. शेवटी सहकारी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या मध्यस्थीला यश आलं आणि वाद मिटला. परंतु तोपर्यंत बघ्यांची गर्दी जमा होऊन मुख्य रस्त्यावरील वाहतूकही खोळंबली होती.
या हाणामारीचा व्हिडीओही उपस्थित विद्यार्थ्यांनी चित्रित केला असून तो समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे महाविद्यालय आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे.
जगात जर्मनी, भारतात परभणी अशी ओळख सांगितल्या जाणाऱ्या परभणीमध्ये घडलेल्या या प्रकाराने शिक्षण क्षेत्रात चांगलीच चर्चा रंगल्याचं दिसून येतंय. या दोन्ही प्राध्यापकांच्या वादाचं नेमकं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही.
ही बातमी वाचा: