परभणीत : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधान शिल्पाची एका माथेफिरूने विटंबना केली अन बुधवारी आख्खं परभणी शहर धुसमसले. मात्र नुकसानीच्या जखमा घेवून परभणीकरांनी पुन्हा एकदा आपल्या दैनदिन व्यवहारांना सुरुवात केली. शहरासह जिल्ह्यात शांतता नांदतेय. पाहूयात कालच्या हिंसाचारानंतर परभणीची आज काय स्थिती आहे ते


संविधान शिल्पाच्या विटंबनेनंतर परभणीत बुधवारी बंदचे आवाहन करण्यात आले. दुपारपर्यंत हा बंद शांततेत सुरू होता. मात्र दुपारनंतर एका टोळक्याने शहरात अक्षरशः धुडगूस घातला. ज्यात शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच सामान्य परभणीकरांच्या गाड्या आणि इतर साहित्याची ही मोठी हानी झाली.  


आजची पहाट झाली ती एक आशेचा किरण घेवून. काल आपल्या दुकानाची काळजी लागलेले शहरातील सर्व छोटे व्यापारी सकाळी आपल्या दुकानावर आले. त्यांनी जी परिस्थिती पाहिली त्याने ते थक्क झालेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून पुढे शहरात आले तर बाजारपेठेतील एकाही दुकानाचे बोर्ड शिल्लक राहिले नाहीत. रस्त्यांवर दुकानाच्या फुटलेल्या काचांचा आणि दगडांचा खच पडलेला. काल जाळपोळ करण्यात आली त्याचे सर्व अवशेष होते. काहींचे तर चक्क ठेले या आगीत धुमसले गेले. काहींच्या फुटलेल्या गाड्या हे पाहूनच परभणीकरांची आज सकाळ झाली. सर्व व्यापाऱ्यांनी, मनपाच्या सफाई कामगारांनी हे सर्व साफसफाई करून पुन्हा एकदा नव्याने आपली दुकान उघडली.


विसावा कॉर्नर परिसरात चहाचा ठेला चालवणारे नितीन मुंजाजी कांबळे जेव्हा सकाळी त्यांच्या ठेल्यावर आले तेव्हा त्यांना काहीच दिसलं नाही. गॅस, भगूने, ग्लास, ठेला सर्वच कालच्या हिंसेत गेलं. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीच वेळ आली आहे. त्यांच्यापासून थोड्या अंतरावर शेख नुर शेख उस्मान याची छोटीशी पंचर काढण्याची टपरी आहे. तीही काल फोडून त्यातील पंचर काढण्यासाठी लागणारे पाने आणि इतर साहित्य गायब आहे. शेख नुर याने काल समाजकंटकांनी पूर्णतः आडवी केलेली ही टपरी सरळ केली. शहरातील अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची हीच परिस्थिती आहे.


या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी शहरातील तीन पोलीस ठाण्यांतर्गत 300 ते 350 जणांवर विविध कलमान्वयने एकुण 8 गुन्हे दाखल केले आहेत. ज्यात 50 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये 41 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. शिवाय या घटनांचे व्हिडीओ सीसीटीव्ही फुटेज चेक करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महासंचालक शहाजी उमप यांनी सांगितलं.  


नुकसानी नंतर शहरातील व्यापारी ही चांगलेच आक्रमक झाले होते. या घटनेला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जबाबदार असल्याने या दोघांचाही बदली करा आणि आमच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून मदत द्या तोपर्यंत आम्ही बाजारपेठ उघडणार नाही अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. मात्र दुपारनंतर अंबादास दानवे हे परभणी दाखल झाले. त्यांनी सर्व पाहणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली आणि यानंतर व्यापाऱ्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत आम्हाला मदत मिळाली तर आम्ही आमचं बेमुदत आंदोलन स्थगित करू अशी घोषणा केली. 


हिंसक घटनेनंतर राजकारणाला ही सुरुवात झाली आहे राष्ट्रवादीच्या राज्यसभा सदस्य फोजीया खान यांनी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी सकल हिंदू समाजाने मोर्चा काढला होता आणि या मोर्चा नंतरच यातील कुणीतरी ही घटना केल्याचे प्रतिक्रिया दिली त्यावर भाजप आमदार मेघना बोर्डीकर तसेच शिंदे सेनेचे नेते आनंद भरोसे यांनी खासदार फौजिया खान आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांच्या वक्तव्यांमुळेच परभणीत ही घटना घडल्याची आरोप करत त्यांची चौकशी करण्याची मागणी केली 


दरम्यान या सर्व घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्यापारी, लोकप्रतिनिधींनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर खापर फोडले. यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्यातच आयजी शहाजी उमप यांनीही थोडासा विलंब झाल्याचे मान्य केले. परंतु जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी मात्र आम्ही परिस्थिती संयमाने हाताळली असल्याचे सांगितले आहे. 


दरम्यान, सध्या परभणी शहरांमध्ये ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. आता सर्वत्र शांतता असून स्वतः आयजी शहाजी उमप परभणीत थांबून आहेत. त्यामुळे त्यांनी परभणीतील जनतेला शांततेचं आवाहन केलेलं आहे. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाच्या शिल्पाची तोडफोड झाली. यानंतर निषेधही झाला. निषेधानंतर हिंसक आंदोलन झालं. या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच परभणीकरांवर न भरून येणाऱ्या जखमाही उमटल्या आहेत. त्यामुळे नेते येत जातील, राजकारण होत जाईल, आरोप प्रत्यारोप होत जातील. मात्र परभणीतील असो की राज्यातील कुठल्याही शहरातील शांतता अबाधित राहणं गरजेचं आहे.