Parbhani: परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण 8 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत 50 जणांना अटक करण्यात आली आहे. परभणीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर आयजी शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अटक करण्यात आलेल्यांमध्ये 41 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणताना धरपकड केली असून, रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले गेले नाही. असंही परभणीचे आयजी शहाजी उमाप यांनी सांगितलं.
सुरक्षेसाठी SRPF च्या तुकड्या
सुरक्षेसाठी फिक्स पॉइंट आणि SRPF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांसोबत जिल्हाधिकारी चर्चा करत आहेत. विविध ठिकाणी घटना घडल्यामुळे विलंब झाला, मात्र आता आम्ही सर्व परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. या घटनांमध्ये 9 पोलिस किरकोळ जखमी झाले आहेत. तसेच, सोशल माध्यमांवरील व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कारवाई करण्यात येणार असल्याचे आयजी उमाप यांनी सांगितले आहे.
पंचनाम्यानला आजपासून सुरुवात
परभणी शहरात बुधवारी दुपारी झालेल्या हिंसक आंदोलनानंतर आता शांतता पसरली आहे स्वतः नांदेड परिक्षेत्राचे आईजी शहाजी उमप परभणी ठाण मांडून असून परभणी शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ज्या दंगलखोरांनी शहरात धुडघूस घालून नुकसान केले आहे, त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. परभणी शहरासह जिल्हाभरात शांतता पसरली असून कुणीही कायदा हातात घेऊ नये, अस आवाहन स्वतः उमप यांनी केले. तसेच जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनीही परभणीकरांना शांततेचा आवाहन केले. महत्त्वाचे म्हणजे शहरात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेशही जिल्हाधिकारी यांनी दिले असून आजपासून मनपा आणि तहसीलदार यांच्या वतीने हे पंचनामे केले जाणार आहेत.
सुषमा अंधारेंचे कॉम्बिंग ऑपरेशवरून सरकारला ताशेरे
कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांचे आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल, तर निश्चितपणे हा अत्यंत निंदनीय आणि निषिद्ध प्रकार आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्याऐवजी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली अशा पिढ्या उध्वस्त करणे आणि बर्बाद करणे, याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. असेही त्या म्हणाल्या.