Parbhani Crime News : परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने चक्क बापालाच पोटाच्या मुलाने पेट्रोल टाकून संपवण्याचा प्रयत्न केला आहे. बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी ही दुर्दैवी घटना सेलू शहरातील लक्कडकोट भागात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, जखमी झालेल्या वडीलांना शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. अजय शहाणे असे आरोपी मुलाचे नाव असून, बजरंग दत्तात्रय शहाणे जखमी वडिलांचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सेलू शहरातील अजय शहाणे याने वडील बजरंग दत्तात्रय शहाणे यांच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी केली होती. परंतु, वडिलांनी पैसे देण्यास नकार दिल्याने मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास अजयने रागाच्या भरात वडील बजरंग शहाणे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूला राहणाऱ्या काही नागरिकांनी भाजलेल्या जखमी शहाणे यांना सेलू उपजिल्हा रुग्णालयात नेले. तेथे प्रथमोपचार करून नंतर त्यांना परभणी शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेमुळे नशेखोर मुलाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
आरोपी मुलगा दारूच्या आहारी...
सेलू शहरातील लक्कडकोट भागात शहाणे कुटुंब राहतात. तर, बजरंग शहाणे यांना अजय शहाणे नावाचा मुलगा आहे. मात्र, अजयला दारूचे व्यसन लागले होते. त्यामुळे तो सतत दारूच्या नशेत असायचा. विशेष म्हणजे दारूसाठी पैसे द्या म्हणून तो घरात वाद देखील घालायचा. दरम्यान, अजय शहाणे याने वडील बजरंग दत्तात्रय शहाणे यांच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी केली होती. परंतु, त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने आजयने रागाच्या भरात वडील बजरंग शहाणे यांच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना पेटवून दिले. यावेळी त्यांनी जीव वाचवण्यासाठी आरडाओरडा केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक धावून आले आणि त्यांना रुग्णालयात दाखल केले.
दारूसाठी घरातील सामान विक्रीला विरोध केल्याने आईला संपवलं...
दरम्यान काही दिवसांपूर्वी असाच काही प्रकार लातूर जिल्ह्यात देखील समोर आला होता. दारूसाठी घरातील सामान विक्रीला घेऊन जाण्यास विरोध केल्याने मुलानेच आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ज्ञानेश्वर नाथराव मुंडे (वय 23 वर्ष) याला दारू पिण्याची सवय होती. तर, तो आई-वडील वडीलांसह राहत होता. ज्ञानेश्वरचा छोटा भाऊ कृष्णा हा पुणे येथे एका खाजगी कंपनीत कामाला आहे. दरम्यान ज्ञानेश्वरचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले होते. त्यामुळे, शेतातील घरात आई संगीता व मुलगा ज्ञानेश्वर हे दोघेच होते. दारुची सवय जडलेल्या ज्ञानेश्वर याला दारू पिण्याची इच्छा झाली. नुकतीच म्हैस विकल्याने घरात आईकडे पैसे असतील, असा अंदाज काढून दारू पिण्यासाठी ज्ञानेश्वर याने आईकडे पैशाची मागणी केली. तेव्हा 'माझ्याकडे पैसे नाहीत' म्हणताच घरात ठेवलेल्या डब्यातील डाळ व इतर जीवनोपयोगी साहित्य तो विक्रीसाठी घेऊन जात होता. घरातील किराणा साहित्य घेऊन जाण्यास आईने त्याला विरोध किला. तेव्हा रागाच्या भरात उखळात कुटण्यासाठी वापरण्याची लोखंडी मुसळ त्याने आईच्या डोक्यात मारून तिला गंभीर जखमी केले. याच मारहाणीत जखमी झालेल्या आईचा मृत्यू झाला.
इतर महत्वाच्या बातम्या: