Parbhani News : परभणीत संविधान शिल्पाची विटंबना झाली, यानंतर परभणी बंदची हाक देण्यात आली होती. या दरम्यान काही समाजकंटकांनी हिंसा केली आणि हिंसेनंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली होती. या कारवाईदरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा मृत्यू झाला या मृत्यूनंतर सोमनाथचा अंत्यविधी उरकून परतत असताना या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विजय वाकोडे (Vijay Wakode) यांचाही हृदविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता. दोन्ही कुटुंबीयांना न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीत धरणे आंदोलन झाले होते. यानंतर परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला होता. यानंतर नाशिकमध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजप आमदार सुरेश धस आणि अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मध्यस्थीने लॉंग मार्च स्थगित करण्यात आला आहे.
आतापर्यंत नेमकं काय-काय घडलं?
- परभणी येथे 10 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या शिल्पाची विटंबना करण्यात आली.
- या निषेधार्थ 11 डिसेंबर रोजी परभणी बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी शांततेत आंदोलन सुरू असताना काही समाजकंटकांकडून धुडगूस घालण्यात आला. यानंतर परभणीत मोठा हिंसाचार झाल्याचे दिसून आले.
- यानंतर पोलिसांनी कारवाई बडगा उगारत लाठीचार्ज केला होता. पोलिसांकडून काही जणांना अटक करण्यात आली होती. यावेळी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबरला मृत्यू झाला होता.
- 16 डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांचा अंत्यविधी झाल्यानंतर सायंकाळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकडे यांचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता.
- सूर्यवंशी आणि वाकोडे कुटुंबाला न्याय मिळावा, दोषी पोलिसांवर कारवाई करावी आणि इतर मागण्या घेऊन परभणीमध्ये आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांकडून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. जवळपास एक महिन्यापेक्षा अधिक काळ हे धरणे आंदोलन सुरु होते.
- 17 जानेवारी रोजी परभणीतील आंदोलकांकडून परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व विजय वाकडे यांचे चिरंजीव आशिष वाकोडे यांनी केले.
- 23 दिवस हा लाँग मार्च सुरु होता. परभणी, जालना, संभाजीनगर येथून हा लाँग मार्च 07 फेब्रुवारीला नाशिकला पोहोचला.
- यानंतर 8 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री मेघना बोर्डीकर, भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी नाशिकला जाऊन या आंदोलकांच्या 15 मागण्या आश्वासन पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
- यानंतर पोलीस उपनिरीक्षक कर्तिकेश्र्वर तूरनर, कर्मचारी सतीश दैठणकर, मोहित पठाण, राजेश जठाल यांचे निलंबन करण्यात आले.
- त्यामुळे हा लाँग मार्च थांबवण्यात आला होता. मात्र, एक महिन्यात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पुन्हा एकदा लॉंग मार्च नाशिकपासून मुंबईपर्यंत काढला जाईल, असा इशारा आशिष वाकोडे यांनी सरकारला दिला आहे.
आणखी वाचा