Sachin Kharat : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांचे दूत सुरेश धस यांच्या शिष्टाईमुळे परभणी प्रकरणी निघालेला लॉंगमार्च थांबला असल्याचे समजते. पण आम्ही आंबेडकरवादी संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार असल्याची भूमिका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी घेतली आहे. 


आमदार सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते


आमदार सुरेश धस यांनी लॉंग मार्चमध्ये शिष्टाई केली, मग लॉग मार्च थांबला असे समजते. परंतु हेच आमदार सुरेश धस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील नेते आहेत. त्यामुळं आमचा प्रश्न आहे की, आमदार सुरेश धस आणि परभणी प्रकरणाचा काय संबंध आहे. परभणी प्रकरणांमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची ज्या समाजकंटकांने तोडफोड केली आहे. त्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का झाला नाही? त्याची नार्को टेस्ट का केली नाही? असे सवाल सचिन खरात यांनी केले. भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कस्टडीमध्ये 15 डिसेंबरला झाला आहे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याच दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. याचा अर्थ दलिताचा जीव गेला याचे काहीही गांभीर्य नाही असे सचिन खरात म्हणाले. 


सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार


मुख्यमंत्री फडणवीस विधानसभेत बोलताना म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या आजारामुळं झाला आहे. हे खूप धक्कादायक वक्तव्य असल्याचे खरात म्हणाले. अजूनपर्यंत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला नाही. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणारे एलसीबी निरीक्षक अशोक घोरबांड यांना निलंबित केले, पण बडतर्फ का नाही? त्यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल का केला नाही? असा सवाल खरात यांनी केला. सुशिक्षित भीमसैनिकांचे गुन्हे का मागे घेतले नाहीत? असेही ते म्हणाले. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचे दूत सुरेश धस यांच्या शिष्टाईमुळे जरी लॉंग मार्च थांबला असला तरी आम्ही आंबेडकरवादी जोपर्यंत संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत लढणार असल्याचे खरात म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


परभणी प्रकरणातील मृत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्या, भीमसैनिकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या, सचिन खरातांनी दिला आंदोलनाचा इशारा