परभणी : मराठा आरक्षण (Maratha Rservation)  या  विषयाभोवती मागच्या दोन महिन्यापासून महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा आंतरवालीत आंदोलन सुरु केले आहे.  परिणामी राज्यातल्या प्रत्येक गावात शहरात आंदोलन सुरु आहेत. मराठा आरक्षणासाठी तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी आज परभणी जिल्हा बंदची (Parbhani Bandh)  हाक देण्यात आली आहे. जिल्हाभरातील बाजारपेठ आज बंद राहणार आहेत. सकल मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे. त्यामुळे आज जिल्ह्यातील बाजारपेठ बंद राहणार आहे.


परभणी जिल्ह्यातील गावा गावांमध्ये आंदोलन सुरू आहेत आता हे आंदोलन तीव्र केले जाणार आहे.  आज जिल्हाभरामध्ये चक्काजामच आयोजन करण्यात आले आहे. शहरात तीन ठिकाणी तर जिल्हाभरात ठिकठिकाणी आज चक्काजाम केला जाणार आहे.  तसेच  जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे आणि त्यानंतर सर्व प्रकारची शेतमाल वाहतूक बंद करण्यात येणार आहे.  सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे.  त्यामुळे सरकारने तात्काळ आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागणी ही करण्यात आली आहे. एकीकडे साखळी उपोषण आणि दुसरीकडे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जात आहे..या बंद बरोबरच झरी बोरी आणि सिंगणापूर या तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. 


मराठा आरक्षण आंदोलकांच्या धास्तीमुळे परभणीची बाजारपेठ बंद 


परभणी शहरासह जिल्हाभरात मंगळवारी मराठा आरक्षणासाठी तब्बल तेरा पेक्षा जास्त ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या बरोबरच मानवत आणि संपूर्ण शहरात कडकडीत बंद ठेवण्यात आलं होतं. मात्र परभणी शहरात काही तरुणांचे गट दुचाकीवरून घोषणाबाजी करत फिरत असल्यामुळे  परभणीची बाजारपेठ  कालपासून बंद ठेवण्यात आलेली आहे.  या तरुणांच्या धास्ती मुळे व्यापाऱ्यांनी आपली दुकान आज उघडलीच नाहीत


मराठवाड्यात आतापर्यंत 3 तहसीलदारांच्या गाड्या फोडल्या


मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिक आक्रमक होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्यात येत असल्याच्या घटना आता समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील रामनगर येथे तहसीलदाराच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना घडलीय, जालना तालुक्यातील बाजीउम्रद गावात मोबाईल टॉवरवर चढलेल्या आंदोलकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांनी चर्चेसाठी येण्याची मागणी होती. दरम्यान, आंदोलनास्थळा जवळून जाणाऱ्या तहसीलदारांची गाडी आडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. तर दुसऱ्या घटनेत बीडच्या आष्टीत तहसीलदार यांची गाडी पेटवून देण्यात आली आहे. आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची घराच्या आवारात उभी असलेली शासकीय गाडी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आहे. या आगीमध्ये तहसीलदारांच्या गाडीचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. यासोबतच आता परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली येथे तहसीलदारांची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.