परभणी : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यात हिंसक वळण लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, मागील दोन दिवसांत मराठवाड्यात 3 तहसीलदारांच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत. तर, काही वेळापूर्वी परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली येथे तहसीलदारांची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. तहसीलदार यांनी पाण्याच्या टाकीवर जाऊन निवेदन स्वीकारण्यास नकार दिल्याने आक्रमक झालेल्या तरुणांनी तहसीलदार यांच्या गाडीवर दगडफेक करत गाडी फोडली आहे.
राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे. परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली येथे तहसीलदारांची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. मानोलीमध्ये गावातील पाण्याच्या टाकीवर चढून मराठा आरक्षणासाठी गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. यावेळी या आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी मानवतचे तहसीलदार रणजितसिंह कोळेकर हे गेले होते. यावेळी निवेदन स्वीकारण्यासाठी टाकीवर जाण्याची विनंती गावकऱ्यांनी केली. मात्र, यासाठी त्यांनी नकार दिल्याने काही तरुण आक्रमक झाले आणि या तरुणांनी तहसीलदारांची गाडी फोडली आहे. या प्रकारानंतर गावामध्ये पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी तसेच पोलीस पथक दाखल झाले आहे. सध्या घटनास्थळी तणावाचे वातावरण असून, पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
मराठवाड्यात आतापर्यंत 3 तहसीलदारांच्या गाड्या फोडल्या
मराठवाड्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन अधिक आक्रमक होतांना दिसत आहे. विशेष म्हणजे शासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडण्यात येत असल्याच्या घटना आता समोर येत आहे. जालना जिल्ह्यातील रामनगर येथे तहसीलदाराच्या गाडीची तोडफोड केल्याची घटना घडलीय, जालना तालुक्यातील बाजीउम्रद गावात मोबाईल टॉवरवर चढलेल्या आंदोलकांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांनी चर्चेसाठी येण्याची मागणी होती. दरम्यान, आंदोलनास्थळा जवळून जाणाऱ्या तहसीलदारांची गाडी आडवून त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलीय. तर दुसऱ्या घटनेत बीडच्या आष्टीत तहसीलदार यांची गाडी पेटवून देण्यात आली आहे. आष्टीचे तहसीलदार प्रमोद गायकवाड यांची घराच्या आवारात उभी असलेली शासकीय गाडी मध्यरात्रीच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली आहे. या आगीमध्ये तहसीलदारांच्या गाडीचे संपूर्णपणे नुकसान झाले आहे. यासोबतच आता परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली येथे तहसीलदारांची गाडी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे.
मराठवाड्यातील बस सेवा विस्कळीत...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठवाड्यात ठिकठिकाणी आंदोलन सुईरू असून, याचे परिणाम बस सेवेवर होतांना दिसत आहे. काही ठिकाणी बसवर दगडफेक करण्यात आल्याने या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील बस सेवा बंद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरसह विभागातील सर्वच जिल्ह्यातील बस सेवा बंद आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
मराठा आरक्षण पेटलं! मराठवाड्यात 12 बस फोडल्या, आष्टीत तहसीलदाराची गाडी पेटवली