Parbhani Accident News:  परभणीच्या गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील (Parbhani-GangaKhed Road) खंडाळी पाटीवर शैक्षणिक सहल घेऊन जाणारी बस आणि एसटीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 22 जण जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. सर्वांवर गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


गंगाखेड येथील संत जनाबाई विद्यालयाची (Parbhani Gangakhed Sant Janabai Vidyalaya) शैक्षणिक सहल घेऊन जाणारी स्कूल बस चाकूरकडे जात होती. याच वेळी अहमदपूर येथून बुलढाण्याच्या जाणारी बस गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी पाटीवर आली असता दोन्ही बसची समोरासमोरच धडक झाली. ज्यात दोन्ही बसमधील 22 जण जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती कळताच  पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ जखमींना बाहेर काढून गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.


जिथे त्यांच्यावर उपचार केले जात आहे. अपघातग्रस्त बसमधील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती ही डॉक्टरांनी दिली आहे. या अपघातात 10 ते 15 वर्षाचे 3 विद्यार्थी जखमी आहेत. नेमका अपघात कुणाच्या चुकीने झाला हे मात्र अद्याप कळले नसून घटनेचा तपास पिंपळदरी पोलीस करत आहेत.   


अपघातग्रस्तांची आमदार रत्नाकर गुट्टे यांनी केली विचारपूस 


परभणीच्या गंगाखेड येथील संत जनाबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीला जाणारी स्कूल बस आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना आज राणीसावरगाव रोडवर घडली. या अपघातात दोन्ही वाहनांमधील 22 जण जखमी झाले आहेत. त्या सर्व जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथे दाखल करण्यात आले. यावेळी गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे (MLA Ratnakar Gutte) यांनी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात (Gangakhed) जाऊन अपघातग्रस्तांची विचारपूस करत वैद्यकीय अधीक्षक हेमंत मुंडे यांच्याशी चर्चा केली. सध्या 2 जणांना खाजगी रुग्णालयात,18 जण गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात तर एका चालकाला अंबाजोगाई तर एकाला परभणी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सर्वांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. 


या अपघाताची बातमी समजताच विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं. घटनास्थळी देखील लोकांनी मोठी गर्दी केली होती. 


ही बातमी देखील वाचा


Samruddhi Mahamarg : देवेंद्रजी गाडी चालवत होते, पोटातलं पाणीही हलत नव्हतं; मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर सांगितला 'टेस्ट राईड'चा अनुभव