CM Eknath Shinde on Samruddhi Mahamarg: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग लोकार्पणाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आले, त्याचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. आनंद याचाही आहे की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे मी या महामार्गाचे काम करू शकलो. आज आम्ही दोघे एकत्र असताना समृद्धी महामार्गाचे लोकार्पण होत आहे, याचा मनस्वी आनंद आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वी तयारीचा आढावा घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः उपस्थित होते. त्यावेळचा एक अनुभव मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला. ते म्हणाले की, "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गाडी चालवली असताना आपण बाजूला बसलो होतो, महामार्गावर प्रवास करताना पोटातलं पाणीही हलत नव्हतं.", असं ते म्हणाले.
समृद्धी महामार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, (Nitin Gadkari) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भारती पवार, रावसाहेब दानवे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "या महामार्गाला आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले, याचा आनंद फार मोठा आहे. आम्हीच काम सुरू केले आणि आमच्याच कारकिर्दीमध्ये लोकार्पण करतोय, ही भाग्याची गोष्ट आहे. भूमी अधिग्रहणामध्ये अनेकांनी अडचणी आणल्या. पण मोपलवार, गायकवाड, परदेशी आदी सर्व अधिकाऱ्यांच्या साथीने आम्ही त्यावर मात केली. शेतकऱ्यांना विश्वास दिला, आरटीजीएसच्या माध्यमातून तात्काळ पैसा त्यांच्या खात्यात जमा केला. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास आम्ही जिंकला. त्यामुळे पुढचे काम सुरू झाले. हा इको फ्रेंडली रस्ता आहे. 35 लाख झाडे लावणार आहोत. 250 मेगाव्हॅट सोलर वीज तयार करतोय. 12 तलाव, नद्या, नाल्यांचे खोदकाम केले. 8 ते 10 महिन्यांत मुंबईपर्यंत रस्ता पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
समृद्धी फक्त महामार्ग नव्हे तर गेमचेंजर
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा फक्त हायवे नाही, तर गेमचेंजर आहे. महाराष्ट्राची नवी लाईफलाईन बनणार आहे. दोन्ही बाजूंना इंडस्ट्रीज, नगर वसवणार आहोत. लाखो लोकांना रोजगार देणारा हायवे म्हणून समृद्धी महामार्ग ओळखला जाणार आहे. देशातील सर्वांत लांब हायवे आहे. आम्ही पाहणी करायला आलेलो असताना देवेंद्र फडणवीसांनी गाडी चालवली, मी बाजूला बसलो होतो. तेव्हा पोटातले पाणीही हलत नव्हते, असा अनुभव मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितला.
ही बातमी देखील वाचा